पुणे – ‘लेडी सिंघम’मुळे गुन्हे शाखा जोमात

विविध 5 कारवायांत तब्बल 51 प्रकरणांचा छडा


पोलिसांनी मरगळ झटकताच गुन्हेगारांचे धाबे दणाणले

पुणे – “लेडी सिंघम’ अशी पोलीस दलात ख्याती असलेल्या ज्योतीप्रिया सिंग यांनी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रभारी कार्यभार हाती घेताच धडाकेबाज कारवाईला सुरूवात केली आहे. गुन्हे शाखेला आलेले मरगळ यामुळे झटकली गेल्याचे चित्र आहे. प्रभारी कार्यभार असला, तरी त्यांनी स्वत:चा प्रभाव दाखवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गुन्हे शाखेतील सर्व युनिट्‌स जोमात कार्यरत झाले आहेत. शहरातील गुन्हेगारीबरोबरच युनिटच्या वैयक्‍तिक कामगिरीवरही त्यांनी लक्ष ठेवले आहे.

गुन्हे शाखेने मागील काही दिवसांत केलेल्या विविध कारवायांमध्ये 51 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासह सराईत गुन्हेगारांकडून देशी कट्टे व काडतूसेही हस्तगत करण्यात आली आहेत. ही सर्व कारवाई अपर पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपायुक्त(गुन्हे) शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गावठी पिस्तूलसह सराईत गुन्हेगारांना अटक
एका सराईत गुन्हेगारासह दोघांना गावठी पिस्तूलासह अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाने मालधक्का चौकात केली. त्यांच्या ताब्यातून चार काडतुसे जप्त करण्यात आली. मालधक्का चौकात सराईत गुन्हेगार त्याच्या साथीदारासह गावठी कट्टे व काडतुसांसह थांबल्याची माहिती हवालदार संजय काळोखे यांना मिळाली होती. अझहर चॉंद शेख (21, रा. गणपती माथा), सागर आर्या(20, रा. भोपळे चौक, दोघेही वारजे माळवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता, अझहरकडे एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे, तर सागरकडे गावठी कट्टा व एक काडतूस असा 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल सापडला. यातील अझरचॉंद शेख याच्याविरुद्ध वारजेमाळवाडी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2018 मध्ये मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे.

गज कापून घरफोडी; महिला जेरबंद
खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा युनिट-2 पथकाने जेरबंद केले आहे. तिच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील 2 लाख 33 हजार 600 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. लक्ष्मी संतोष अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (31, रा. नावरस्ता, नाडे, ता.पाटण) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलीस नाईक गोरे व पोलीस शिपाई फरांदे यांनी मिळालेल्या माहितीवरुन स्वारगेट बसस्थानक परिसरातून लक्ष्मी हिला सापळा रचून अटक केली. तिच्याकडे पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत तिने दिवसा 3 आणि रात्री एक घरफोडी केल्याची कबुली दिली. याप्रकरणांतील 73 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तिने स्वारगेट, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि वारजे माळवाडी हद्दीत घरफोड्या केल्या आहे. ती कचरा वेचकाचे काम करते तर तिचा पती व्यसनी आहे. कचरा वेचताना ती बैठी घरे हेरत असे. यानंतर घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत असे. घरातील किंमती ऐवज चोरल्यानंतर ती पुन्हा काही दिवस मूळ गावी जाऊन राहत होती. एका घटनेत सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाल्याने तिचा माग लागला. तिच्यावर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.

बसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद
पीएमपी आणि एसटी बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-2 पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांना वाडिया महाविद्यालयाजवळ पकडण्यात आले. शांता राजू जाधव (50), चंद्रभागा बजेंत्री उर्फ गायकवाड (45, दोघीही रा.मुंढवा), सुचित्रा ज्ञानेश्‍वर जाधव (30 ,रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, लक्ष्मण ढेंगळे, सहायक पोलीस फौजदार अनिल उसुलकर, संजय दळवी, यशवंत आंब्रे, अजय खराडे, फरांदे, चेतन गोरे, उत्तम तारु, महिला कर्मचारी तारु, गोपाल मदने यांच्या पथकाने केली.

सराईताकडून दोन पिस्तूल, काडतुसे जप्त
सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-3ने कोथरुडच्या एकलव्य महाविद्यालय परिसरात केली. एकलव्य महाविद्यालय परिसरात एका सराईत गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सम्या उर्फ समाधान राऊत (21, रा.नाना-नानी पार्क, शास्त्रीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळली. याची किंमत 61 हजार रुपये आहे. सम्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरी, वाहनचोरी, घरफोडी व विनयभंग असे पाच गुन्हे कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने पिस्तूल कोठून खरेदी केले, कोणाला विकणार होता याची माहिती घेतली जात आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे व पोलीस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, प्रशांत पवार, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, कैलास साळुंके यांच्या पथकाने केली.

सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून 38 गुन्हे उघड
सराईत गुन्हेगारांच्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-5 पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दरोडा, जबरी चोरी व वाहनचोरीचे एकूण 38 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे गुन्हे त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 17 लाख 16 हजार 214 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये 402 ग्रॅम सोने, 5 ग्रॅम चांदी आणि 11 दुचाकींचा समावेश आहे. ऋषिकेश उर्फ हुक्‍या श्रीकांत गाडे (22, रा. सुवर्णयुग मित्रमंडळ, अपर इंदिरानगर), गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस (27, रा.पर्वतीदर्शन), चॉंद फकरुद्दीन शेख (20, रा. बिबवेवाडी), गणेश बाळासाहेब कांबळे (21, रा.अप्पर सुपर), सूर्यकांत किसन कोळी (23, रा. घोरपडी पेठ) तोहीत तय्यब काझी (28, रा. घोरपडी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

या टोळीचा म्होरक्‍या हुक्‍या हा चोरीच्या वाहनांचा वापर करुन कोयत्याचा धाक दाखवत नागरिकांना लुटत होता. त्याच्यावर खुनाचे दोन व खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातून तो कारागृहाबाहेर पडला आहे. यानंतर त्याने त्याच्या शालेय मित्रांना एकत्र करुन जून 2018 मध्ये एक टोळी तयार केली होती. या माध्यमातून त्याने दरोडा, जबरी चोरी व वाहनचोरीचे सत्र सुरू केले होते. दरम्यान, तो साथीदारांसह कोंढवा येथील खडी मशीन चौकात एक पेट्रोल पंप लुटण्यासाठी येणार असल्याची खबर पोलीस हवालदार अमजद पठाण व पोलीस नाईक अंकुश जोगदंडे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना ग्रीन पार्क सोसायटीच्या कंपाउंडलगत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे तीन दुचाकी, दोन कोयते, दोन सत्तुर, एक फायटर, तीन लाल मिरची पावडरच्या पुड्या, पेपर स्प्रे, नायलॉन दोरी असा 2 लाख 8 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, संतोष तासगावकर, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण शिंदे व संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, अमजद पठाण, राजेश रणसिंग, दत्ता काटम, समीर शेख, राजाभाऊ भोरडे, संजय देशमुख, महेश साळवी, सचिन घोलप, दया शेगर, प्रमोद गायकवाड, अंकुश जोगदंड, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, प्रमोद घाडगे, अशोक शेलार, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

चोरीच्या पैशांतून प्रेयसीची हौस
यातील हुक्‍या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर प्रेयसीला जाळून ठार मारल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र गुन्ह्यातून तो कारागृहातून बाहेर पडला. मात्र त्याचे इतर सर्व साथीदार कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. यामुळे त्याने शाळेतील वर्गमित्रांनी एकत्र करुन पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले होते. चोरीचे पैसे ते मौजमजेसाठी वापर होते. तर यातील दोन गुन्हेगारांनी चोरीचे पैसे प्रेयसीवर खर्च करत असल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)