पंचनाम्याअभावी मृतदेहाचे शवविच्छेदन रखडले

पोलिसांचा येथेही हलगर्जीपणा : नातेवाईकांचा संताप

पिंपरी – मृत्यूनंतरही पोलिसांच्या हलगर्जीपणा पाठ सोडत नाही. सुमारे सात तास केवळ पंचनामा न झाल्याने मृतदेह शवविच्छेदनाअभावी शवागृहात पडून होते. हा प्रकार यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात घडला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नातेवाईक तसेच नागरिकांतून मोठा संताप व्यक्त होत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलीस पंचनाम्यासाठी आलेच नाहीत मयत इंद्रभान आनंद भोर यांच्या परिचितांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही सकाळीच रुग्णालयात दाखल झालो. आम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र दुपारी दोन वाजले तरी पंचनामा करण्यासाठीही पोलीचस आले नाहीत.

सगळे नातेवाईक घरी वाट पाहत आहेत आणि आम्ही येथे शवागृहाबाहेर उभे आहोत. दुःखामध्ये असतानाही आम्हाला अशी वेदनादायक वागणूक मिळत आहे. पिंपरी येथील शाहूनगर येथील सुभाष पांडुरंग सोनवणे (वय 60 ) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएममध्ये आणला. मात्र, मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर काही तास उलटले तरी त्याचे शवविच्छेदन झाले नव्हते.

नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतरही प्रशासनावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर रामनगर येथील इंद्रभान आनंद भोर (वय 72) आणि सोनाबाई बापू विटकर (वय 75) यांचाही दीर्घ आजारांने मृत्यू झाला. त्यांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे अजून तीन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शवागृहात आणले. मात्र सकाळपासून एकही मृताचे शवविच्छेदन झाले नसल्याने नातेवाईकांनी शवगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती.

निष्काळजी तळेगाव दाभाडे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात शवविच्छेदन संबंधित अहवाल बनविण्यासाठी दररोज एका पोलीस ठाण्याच्या टीमने जाण्याचा नियम आहे. त्यानुसार आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा नंबर होता. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याची टीम दुपारी दोनपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शवगृहाबाहेर गर्दी केली. अखेर दुपारनंतर पोलिसांची टीम दाखल झाली आणि पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनास सुरुवात झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)