उणिवांची जाणीव : अभ्यासाचा आभास

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सर्वानांच शिकवणारा क्षण म्हणजे शिक्षण, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण ह्या प्रत्येक क्षणाला सतत काही-ना-काही तरी शिकून, समजून घेऊन, जाणून घेऊन, लक्षात घेऊन आपल्या आयुष्यांतील प्रत्येक क्षण आपण खरंच विलक्षण करत असतो का ? विचार, वर्तन आणि व्यवहार करण्याअगोदर आपण प्रत्येक बाबतीत खरंच अभ्यास किती करतो? किती, काय, कसं, का, कोण, केव्हा, कोठे, कशासाठी ह्यापैकी कशाचा तरी बारकाईनं प्रत्येक बाब पूर्णपणे समजून घेऊन विचार करतो का? ह्या सर्वच बाबी समजून, जाणून घेण्याची गरज नसते का? काही वेळा आपल्या भ्रम आणि संभ्रमामुळे आपण सतत अशा अविर्भावात असतो की, आपल्याला सगळंच कळतं, समजतं, माहिती असतं, हीच खरी उणीव असते. अनेक बाबींकडे त्याच कारणांमुळे आपण दुर्लक्ष करत असतो. आपलं शालेय, महाविद्यालयीन आणि त्या पुढील उच्च शिक्षण झालं, की अनेकदा स्वतःला आपण सर्वज्ञ असल्याचं समजायला लागतो, याची साधी जाणीवही होत नाही. का बरं इतके गाफील राहून विचार, वर्तन आणि व्यवहार करायला लागतो ?

प्रा .शैलेश कुलकर्णी 

आभासी दुनियेचं आकर्षण

अलीकडच्या काही काळापासून अनेकांना आभासी दुनियेचं प्रचंड आकर्षण वाटू लागलं असल्याचं स्पष्ट होतं. सोशल मीडियाइतका विश्‍वास, भरवसा इतरांवर तर लांबच, परंतु स्वतःवर देखील ठेवला जाऊ नये, ह्यापेक्षा दुसरी उणीव आणि शोकांतिका नाही. शोकांतिका अशासाठी कारण, अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला त्रास, मनस्ताप, दु:ख, नुकसान, फसवणूक आणि कालांतरानं पश्‍चाताप भोगण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचं आपण सर्वच ऐकत आहोत. सोशल मीडियाच्या आहारी जाण्यामुळे आणि फसगत झाल्यामुळे सोशल मीडिया आपल्याला सोसत नाही, हे अभ्यासपूर्वक समजून घेण्याची गरज असते. गुगल काही वेळा गुगली टाकत असतं, हे लक्षातच घेतलं जात नाही. सोशल मीडिया, गुगल, विविध वेबसाईट अनेकदा आपल्याला अत्यंत योग्य, चांगली, गरजेची, आवश्‍यक माहिती पुरवतात, परंतु नेहमीच तसं घडेल असंही नाही, हे अभ्यासण्याची अधिक जरुरी असते. गुगलवर जेव्हढा विश्‍वास ठेवावा असं अनेकांना वाटतं, तेव्हढा ते कोणावरही अगदी स्वतःवर देखील ठेवायला तयार होत नाहीत. अनेकांना गुगलवर एखादा पत्ता शोधताना मनस्ताप झाल्याचं अनुभवायला येत असतं, सोशल मीडीयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या खोट्यानाट्या जाहिरातींना भुलून आजवर अनेकांची आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या फसवणूक झाल्याचं आपल्याला अलीकडच्या काळांत अगदी रोजच वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळत आहे. काही व्यावसायिक वेबसाईटच्या माध्यमातून खोटे आर्थिक व्यवहार करून, बॅंक खात्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ती खातेदाराकडून लबाडीनं, खोटेपणानं मिळवून नकळत आर्थिक फसवणूक केली जात असल्याचंही आपण अलीकडच्या दिवसांमध्ये ऐकत आहोत. अर्थात, ह्या आभासी दुनियेत सहभागी व्हायला काहीच हरकत नाही, परंतु प्रथमतः त्याची सविस्तर माहिती करून घेऊन, सखोल अभ्यास करून आणि योग्य दक्षता बाळगून मगच सावधपणे विचार, वर्तन आणि व्यवहार करणं हिताचं ठरतं. ह्याची जाणीव प्रत्येकानंच सतत ठेवणं सद्य:स्थितीत आवश्‍यक आहे.

अभ्यासाचं महत्व

प्रत्येक बाबतीत अभ्यासाचं महत्व आपण निश्‍चितच समजून घ्यायला हवं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यक्तिगत स्वरूपातील कोणती माहिती किती द्यायची ह्याची सतत जाणीव होणं आवश्‍यक असतं. अनेकदा आपलं लोकेशन फेसबुकवर जाहीर केलं जातं, आपण परगावी गेल्याच्या संदर्भातील पोस्टनं जगजाहीर झाल्यामुळे घरफोड्या झाल्याच्या घटना घडत असल्याचं आपल्याला वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतं. अनेकजणांना स्वतःच्या आजारपणामुळे घ्याव्या लागत असलेल्या औषधांची नावं, ती घेण्यामागील कारणं, त्यांतील प्रमुख घटक ह्यासंबंधी काहीच माहित नसतं. त्या संबंधीचा थोडातरी अभ्यास करावा असं खरंच किती जणांना वाटत असतं ? त्या बाबतीतला अभ्यास जरुरीचा नाहीये का ? आपण स्वतःच्या अभ्यासातून औषध कोणतं घ्यायचं आहे हे अजिबातच ठरवायचं नाहीये. परंतु डॉक्‍टरांनी आपल्याला दिलेल्या औषधांची जुजबी माहिती असण्याचा उपयोग इमर्जन्सीच्या वेळी निश्‍चितच होऊ शकतो. औषधे विकत घेताना त्यांची वैधता, किंमत इत्यादी आपण तपासून घेतो का? घरात शिल्लक राहिलेली औषधे फारशी वापरलीच गेली नाहीत, ती वापरण्यापूर्वी त्यांची वैधता आपण पाहतो का ? अनेकदा खाण्याच्या परंतु नाशवंत वस्तू, काही पदार्थ ठराविक कालावधीतच वापरून संपवावे लागतात. अशा नेहमी न लागणाऱ्या वस्तूंची वैधता तरी त्या खायच्या, वापरायच्या अगोदर आपण नीटपणे काळजीपूर्वक तपासतो का? अशा अनेक बाबतीत आपला अभ्यास कमी पडत असल्याची जाणीव करून घेणं आणि त्याचं महत्त्व समजून घेणं सद्य:स्थितीत आवश्‍यक आहे.

अभ्यासाचा अभाव

आपल्या दैनंदिन जीवनांत अनेकदा विविध कारणास्तव निरनिराळे अर्ज, माहितीपत्र, बॅंकांचे के वाय सी, कर्जाच्या संदर्भातील, घर खरेदीच्या वेळी बिल्डर्स बरोबर करावे लागणारे करारनामे, अनेक कायदेशीर प्रक्रियेत पूर्तता करण्यासंबंधीची कागदपत्रं अशा अनेकविध कागदपत्रांवर आपण स्वाक्षरी करण्याअगोदर त्यांचं पूर्ण वाचन, सखोल अभ्यास करतो का ? बॅंकांचे, इन्शुरन्स कंपन्यांचे सर्वच कागद, अगदी काहीवेळा तर काहीही न लिहिलेले कोरे कागद देखील करारनाम्याच्या नावाखाली डोळेझाक करून, अतिविश्‍वास ठेवून अथवा गरजेपोटी स्वाक्षरी करून आणि त्याची कोणतीही स्थळप्रत, कॉपी आपल्याजवळ संदर्भासाठी न ठेवता आपण संबंधिताकडे जमा करत असतो. असं का नाही वाटत कि, आपल्या अभ्यासाच्या अभावामुळे भविष्यात आपल्यावरच पश्‍चात्तापाची वेळ येऊ शकते? जागेच्या आणि बॅंकेच्या बाबतीत अशा स्वरुपातील अनेक किस्से ऐकू येत असतात. मला असं वाटलं होतं, असं असेल हे माहिती नव्हतं, चर्चेच्या वेळी असं सांगितलं नव्हतं अशा अनेक विषयांवर कागदपत्रांवर सह्या केल्यानंतर चर्चा करून काहीही उपयोग होत नसतो, ह्याची जाणीव अगोदरच होणं महत्त्वाचं आणि जरुरीचं असतं.

अभावाचे परिणाम

काही वेळा करिअर निवडीचा घेतलेला निर्णय तापदायक ठरल्याचं अनुभवायला येतं. आपण कोणतं करिअर आणि कशासाठी निवडायचं ठरवलं ? ठरवलं खरं परंतु काहीतरी भलतंच झालं असंही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. करिअर निवडण्याच्या वेळेला मार्गदर्शन करणारे खूप जण भेटतात परंतु, योग्य करिअर निवडल्यावर यशप्राप्तीच्या मार्गाचं दर्शन घडवणारी व्यक्ती भेटतेच असं नाही. एकूणच आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्येक अनुभव सुखद असण्यासाठी आवश्‍यकता असते ती योग्य करिअर निवडून अर्थार्जन करण्याची, पैशाच्या योग्य वापराची, बचतीची आणि गुंतवणुकीची. प्रत्येकाच्या जशा गरजा वेगवेगळ्या असतात तसंच उत्पन्न अथवा आपल्या हाती येणारा पैसा देखील कमीअधिक प्रमाणात आपल्या पदरी पडत असतो. खरं कसब आपल्या करिअर निवडण्यात असतं. जो योग्य करिअरची निवड करतो, तोच अर्थार्जन उत्तम प्रकारे करू शकतो. आपण निवडलेल्या करिअरचा केवळ गरजेपुरता आणि अर्थार्जनासाठी उपयोग करून चालणार नाही, तर करिअरमधील स्थिरता आणि आत्मिक आंनद मिळवण्याचं तंत्र अवगत केलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येक बाबतीत चिकित्सा केली पाहिजे. करिअरची निवड करण्यापूर्वी आपल्या गरजांची योग्यता, त्यांची आपण करत असलेली अपेक्षा आणि त्यांची पूर्तता या सर्वच बाबींचा आपण अभ्यासपूर्वक विचार करणं महत्त्वाचं असतं.

आजच्या गतिमान, आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात अन्न, वस्त्र आणि निवारा या किमान प्राथमिक गरजांचा विचार करून फक्त चालत नाही, तर बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचाही स्वीकार करावा लागतो. आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला शारीरिकदृष्ट्या साथसोबत करणारं, मानसिक आधार देणारं, अंतर्मनाला धीर देणारं, आर्थिकदृष्ट्या सक्षमता देऊ करणारं, सामजिक पत निर्माण करणारं, शैक्षणिक प्रगतीची दिशा दाखवणारं, कौटुंबिक एकोपा टिकवणारं, आपली नातीगोती जपणारं, उणीवा दूर करणारं, आपल्या जाणिवा जपणारं, आपल्या जाणिवांना नेणिवेपर्यंत घेऊन जाणारं, आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं आपलं हक्काचं साधन हे दुसरं-तिसरं कोणतंही नसून ते म्हणजे आपलं करिअर अर्थात “अर्थार्जनासाठी निवडलेला आपल्या आवडीचा मार्ग” असतो. करिअरची निवड करण्यासंबंधीचा सखोल अभ्यास केला नाही, तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात, ह्याची जाणीव ठेवणं जरुरीचं असतं.

अभ्यासाचा आभास

आपण प्रत्यक्षांत जे नाहीत ते आहोत, असं जगाला दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत आपला अहंकार आणि दंभ वाढत असतो, त्यामुळे समजण्याची जाणीवच उरलेली नसते. मोठेपणाच्या अट्टाहासानं एक वेळ अशी येतेच की, अनेक बाबतीत आपला अभ्यास कमी आहे आणि खोटेपणा लपवण्याची धडपड सुरू आहे हे स्पष्ट होतं. निर्माण केलेला आभास हा फार काळ टिकत नसतो, हे न समजणे हीच खरी उणीव असते. आभासाचा विपरीत परिणाम काही वेळा काही विवाहांच्या पश्‍चात घडून आल्याचं आपल्याला समजतं. विवाह निश्‍चित करताना ग्लॅमर नाही, तर ग्रामर महत्वाचं असतं. तिथे देखील सुरुवातीचा आभास कितीही प्रभाव निर्माण करणारा असला, तरीही कालांतरानं प्रभावापेक्षा मूळ स्वभाव आणि एकूणच अभ्यासातील अभाव दिसून येऊ लागतो. सुरुवातीला चमकणारं सोनं कालांतरानं तांबं असल्याचं कळलं की अभ्यासाचा आभास केल्याचं, पितळ उघडं पडतं. पवित्र मानल्या जाणाऱ्या, विवाहाच्या संस्कारांतून निर्माण होणाऱ्या नात्यासाठी काहीवेळा वधू-वर यांच्या निवडीत देखील अभ्यासाचा अभाव असल्याचं दिसून येतं. संपूर्ण आयुष्य सहजीवनाच्या मार्गानं व्यतीत करायचं असतं, हे सर्वज्ञात असूनही अवघ्या काही तासांत विवाह निश्‍चित केले जातात. काही वेळा अभ्यासाचा अभाव, तर काहीवेळा आभास असल्याचं कळतं, पण वळत नाही, हीच उणीव असते. आपल्या प्रत्येक विचार, वर्तन आणि व्यवहारात अभ्यासच महत्त्वाचा ठरत असतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)