पिंपळे निलखमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव

प्रतिनिधिक छायाचित्र

काय हव्या सुविधा
विकासकामे झाली परंतु पाणीपुरवठ्याच्या नियोजनाअभावी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
महापालिकेची आठवी ते दहावी शाळा

सांस्कृतिक भवन, बस टर्मिनल
खेळाचे मैदान, जलतरण तलाव

पिंपरी – पिंपळे निलख – रक्षक सोसायटी परिसरात रस्ते, पाणी, सांडपाणी नलिका, पथदिवे आदी कामे झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन न झाल्याने सध्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येथील दवाखान्यात नागरिकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पिंपळे निलख गाव दोन टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. 1982 ला पहिल्या टप्प्यात गावाचा बहुतांश भाग महापालिकेत आला. तर, 1997 मध्ये रक्षक सोसायटी आणि भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा परिसर महापालिकेत समाविष्ट झाला. गावामध्ये प्रमुख रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र, अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यांची कामे होणे गरजेचे आहे, असे मत अविनाश काटे, संकेत साठे, अनिल साठे यांनी व्यक्‍तकेले.
महापालिकेच्या दवाखान्यात अस्वच्छता पाहण्यास मिळते.

बाह्यरूग्ण विभागात दिली जाणारी सुविधा अपुरी आहे. येथील दवाखान्यात आवश्‍यक औषधे उपलब्ध होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. गावामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी प्रश्‍नाची तीव्रता जास्त जाणवत आहे. त्यांना अक्षरश: टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्‍न तातडीने सोडविणे आवश्‍यक आहे.

पिंपळेनिलख परिसरात विविध भागामध्ये लष्कराच्या ताब्यात जागा आहेत. त्यामुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरासारखा गावाचा विकास होऊ शकलेला नाही, अशी माहिती अतुल खरात यांनी दिली. रक्षक सोसायटी चौक ते पिंपळे निलख गाव, वाकडफाटा ते विशालनगर हे रस्ते लष्कराच्या ताब्यातून महापालिकेकडे आले आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. गावामध्ये विकासकामांसाठी 15.36 हेक्‍टर क्षेत्रावर 14 आरक्षणे टाकलेली आहेत. त्यातील आत्तापर्यंत 9.17 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा महापालिकेला मिळाला आहे. तर, 6.19 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा बाकी आहे. त्याचा ताबा घेऊन आरक्षणांचा विकास होणे आवश्‍यक आहे.

गावामध्ये पाच एकर क्षेत्रात शहीद अशोक कामठे उद्यान, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जेवर चालणारी स्मशानभूमि, प्रभाकर साठे उद्यानाचे नूतनीकरण आदी कामे सुरू आहेत. महापालिकेच्या शाळेत ई-लर्निंग, स्पीकिंग इंग्लिश, सेमी इंग्रजी आदींचे वर्ग सुरू आहेत. येथील दवाखान्यात विविध सुधारणा करणे आवश्‍यक आहे. गरोदर महिलांची योग्य सोय व्हायला हवी. परिसरात चोवीस तास पाणी योजनेचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच, पाण्याची टाकी उभारली जात आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा पाणी प्रश्‍न सुटेल.

– तुषार कामठे, नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)