नवी दिल्ली – लष्करातील वरिष्ठ पदांवर आज मोठे फेरबदल करण्यात आले. पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची आज लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. अधिकृत सूत्रांनी आज ही माहिती दिली. ले.जन. नरवणे हे ले.जन. डी. अंबू यांच्या जागेवर लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील. ले.जन. डी. अंबू हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. ले.जन. नरवणे हे सर्वात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे भविष्यात लष्कर प्रमुख पदासाठी त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे या वर्षी 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
ले.जन. नरवणे यांनी आपल्या 37 वर्षांच्या लष्करी सेवाकळामध्ये शांतता काळात, युद्धभुमीवर आणि घुसखोरी विरोधी वातावरणात अत्यंत सक्रिय अश अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि पूर्वसीमेवरील इन्फन्ट्री ब्रिगेडची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
याशिवाय मिलीटरी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल ले.जन.अनिल चौहान यांची पूर्व विभागाच्या जनरल कमांडिंग ऑफिसर इन चीफ पदावर तर लेफ्टनंट जनरल ए.एस.क्लेर यांची नैऋत्य विभागाच्या जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ले.जन.ए.एस.क्लेर हे ले.जन.चेरिष मॅथेसोन यांची जागा घेतील. ले.जन.चेरिष हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.
तर मध्य विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाची जबाबदारी ले.जन.आय.एस.घुमान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर ले.जन. आर.पी. सिंह यांच्यवर पश्चिम विभागच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.