मनमानी कारभार सिद्ध करण्याचे चेअरमन गणपत पाटणे यांचे आव्हान
मेणवली – कुसगाव, ता. वाई येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक महादेव वरे व त्यांच्या सहकारी सदस्यांकडून चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची खुर्ची मिळविण्यासाठी कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. मासिक मिटिंगला जाणीवपूर्वक गैरहजर राहून वृत्तपत्रात पत्रकबाजी करून संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्रही संबंधितांकडून सुरू आहे. दरम्यान, मनमानी कारभाराचे आरोप करणाऱ्यांनी तसे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान विद्यमान चेअरमन गणपत गेनू पाटणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
11 संचालक, 250 सभासद व पंधरा लाख रुपये भागभांडवल असणारी कुसगाव सोसायटी “विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीद वाक्य घेऊन स्थापनेपासून आजपर्यंत सभासदाचे हिताचेच काम करत राहिल्याने कायम “अ’ वर्गात राहिली आहे. हे सर्वश्रुत आहे. परंतु काही संचालक गावातील काही अपप्रवृत्तींना हाताशी धरून पदाच्या हव्यासापोटी संस्थेच्या नावाचा गैरवापर करत आहेत हे सर्व सभासदाच्या लक्षात आले आहे.
लवकरच या सर्वांची सभासदच पोलखोल करणार आहेत. चेअरमनपदाची खुर्ची प्रयत्न करूनही मिळत नसल्याने संस्था अडचणीत आणण्यासाठी मासिक मिटिंगचे नोटीस मिळूनही जाणीवपूर्वक मिटिंगला गैरहजर राहणारे सभासद व ग्रामस्थानी बोलवलेल्या मिटिंगलाही केलेल्या गैरकृत्याचे पितळ उघडे होण्याच्या भीतीने हजर राहण्याऐवजी पाठीमागून हवेत बार उडवत असल्याचा आरोपही यावेळी विद्यमान चेअरमन यांनी केला आहे. सत्ता हातात नसल्यामुळे काही मंडळीची राजकीय दुकाने बंद पडल्याने संस्थेची बदनामी करून राजकीय पोळी भाजण्याचा खोटा उद्योग करत गावभर चकाट्या मारत सहकाराला काळीमा फासण्याचे काम करत आहेत हे कुसगावच्या जनतेच्या लक्षात आले असून दूध का दूध और पानी का पानी ग्रामस्थ व सभासद दाखवून देणार आहेत.
सर्वसामान्य जनतेची आर्थिक आधार बनलेली कुसगाव सहकारी संस्था पदाच्या लालसेपोटी बदनाम करणारे संस्थेच्या व सभासदाच्या हिताचा खोटा कळवळ आणणारे नोटीस पाठवूनही आजपर्यंत मासिक सभांना गैरहजर का राहिले? याचे उत्तर त्यांनी गावच्या व सभासदाच्या समोर जाहीर सभेत द्यावे.
गणपत गेनू पाटणे, विद्यमान चेअरमन