इस्लामाबाद – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आज होणार आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून 47 वर्षीय जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्या शिक्षेला भारताने आयसीजेमध्ये आव्हान दिले. त्यानंतर आयसीजेने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने पाकिस्तानला दणका बसला होता.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन्ही बाजुंचा दृष्टीकोन आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत हा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने कुलभूषण जाधवला हेरगिरी आणि दहशतवाद प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर मे महिन्यात भारताने या शिक्षेविरुद्ध हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १० सदस्यीय पीठाने या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानने सुनावलेली शिक्षा रोखली. या प्रकरणी द हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर सुनावणी आज पासून सुरु झाली असून ते २१ फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे.