कुलभूषण जाधव यांनी शिक्षा रद्द करून त्यांच्या सुटकेचे आदेश द्यावेत 

भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली भक्कम बाजू

 हेग  – कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भक्कम बाजू मांडली. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हास्यास्पद प्रकरणाचा आधार घेऊन जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ती शिक्षा रद्द करून जाधव यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश द्यावेत, असे साकडे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला घातले.  भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असणाऱ्या जाधव यांच्याविरोधात हेरगिरी आणि दहशतवादाचे कुभांड रचूून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये शिक्षा ठोठावली. त्या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देत पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली. आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखीच ताणले गेले असताना आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव प्रकरणाची चार दिवसीय सुनावणी सुरू झाली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीष साळवे यांनी सुमारे तीन तास भारताची बाजू जोरदारपणे मांडली. त्यांनी पाकिस्तानातील न्याय प्रक्रियेचे धिंडवडे उडवले.

पाकिस्तानी लष्करी न्यायालयात चालवण्यात आलेला खटला बेकायदा ठरवला जावा. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालये स्वतंत्र नाहीत. त्या न्यायालयांचे युरोपीय संसदेने वाभाडे काढले होते. परदेशी व्यक्तीला न्याय्य पद्धतीने खटला चालवला जाण्याशी संबंधित अधिकार आहे. मात्र, पाकिस्तानी लष्करी न्यायालयांनी मागील दोन वर्षांत अपारदर्शक सुनावणींच्या माध्यमातून तब्बल 161 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली, असे साळवे यांनी नमूद केले. जाधव यांचा खटला लष्करी न्यायालयात चालवला गेल्याकडे लक्ष वेधत साळवे यांनी त्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली.

जाधव एखाद्या दहशतवादी कृत्यात सामील असल्याचे दर्शवणारा एकही विश्‍वासार्ह पुरावा पाकिस्तानकडून देण्यात आला नाही. जाधव यांनी दिलेल्या कथित कबुलीमागे बळजबरी झाल्याचे दिसते. अटक झाल्यानंतर महिनाभराने जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानने गुन्हा दाखल केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जाधव यांना वकिलातीची मदत उपलब्ध होऊ देण्यास पाकिस्तान बांधील होता. मात्र, त्या देशाने जाणीवपूर्वक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले. वकिलातीच्या मदतीशिवाय जाधव यांचा ताबा अवैध ठरवला जावा.

व्हिएन्ना करारानुसार परदेशी व्यक्तीच्या अटकेची माहिती संबंधित देशास देणे बंधनकारक आहे. मात्र, पाकिस्ताने जाधव यांच्या अटकेबाबत भारताला माहिती दिली नाही. वकिलातीची मदत उपलब्ध होऊ न दिली गेल्याने जाधव यांच्याबाबत पाकिस्तानात काय घडले याची माहिती भारताला नाही. पाकिस्तानने जाधव यांच्या कुटूंबीयांना त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली. मात्र, जाधव कुटूंबीयांना चांगली वागणूक दिली गेली नाही, असे साळवे यांनी नमूद केले. जाधव यांच्याशी संबंधित चौकशीचा तपशील पाकिस्तानने भारताला दिला नाही. खटल्यावेळी जाधव यांना कुठला वकील उपलब्ध करण्यात आला नाही, या वस्तुस्थितीवरही त्यांनी बोट ठेवले. आता खोटारडेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा उद्या (मंगळवार) युक्तिवाद होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)