कृषीप्रधान देश आणि मायबाप सरकार…! (प्रभात ब्लॉग)

हा काळ महत्वाचा याचसाठी की नविन काही करताना, निवडताना काळजी घेणे गरजेचे ठरते. शेतकरी वर्ग दिवसेंदिवस हलाखीच्या जीवनशैलीकडे वाटचाल करत आहे. पावसाची अनियमितता आणि व्यवस्थेची उदासिनता ही प्रमुख कारणं या मागची आहेत. योग्य हमीभाव नसणे, शेती प्रश्नावरील राजकारण, कर्जाचा विळखा अशा काही कारणांनी शेतकरी अस्वस्थ झाला आहे. मुलांचे शिक्षण आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उभी हयात खर्च होते. उत्पादित मालाला भाव मिळाला तर जीवनमान उंचावण्याला मदत होईल. शेतजीवनाचे वास्तव खूप भयानक आहे. वरिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा अवस्थेत आज शेती आहे. 

आज शेतीतील मशागत आणि गुंतवणूक यांच्या बदल्यात उत्पन्न यात खूप मोठी तफावत आहे. उर्वरीत व्यवस्था शेतीजीवनाच्या शोषणावरच उपजिवीका भागविते. शाश्वतच्या नावाखाली शेतकरी वर्गाचे भांडवल करून समाजकारण केले जाते. चळवळीत राजकारण भरलेले बियाणे निवडीपासून खते पेरण्यांपर्यंत संघर्ष करावा लागतो. गावात मोक्काट फिरणारी तरूणांची टोळी असते. पण रानात काम करायला माणूस भेटत नाही. शेतमजुराची मजुरी देणी परवडत नाही. शेतकऱ्यांच्या मुलांस नोकरी करावी वाटते. गार सावलीत बसावे वाटते. ते गैर नाही. शेतजीवनातून जे नोकरी, व्यवसायाकडे वळाले त्यांनी शेतीकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतीबाबतची अनास्था इथे सुरू होते. शेतीत पिकत नाही. पिकलेले विकत नाही. शेतकरी पाल्याचे शिक्षण सुरू होते आणि त्यातच त्याची पिळवणूकही सुरू होते. शेतकरी वर्गांच्या मुलांचे शिक्षण आणि इतर वर्गातील मुलांचे शिक्षण यात तफावत निर्माण होते. नोकरी, व्यवसायाच्या मागे पळताना दमछाक होते. दहा एकरा वरचा शेतकरी अर्ध्या एकरावर येऊन ठेपला आहे. शेतकरी म्हणून शिक्षण आणि नोकरीत कुठलेही आरक्षण नाही. भूमीपुत्रांचे शिक्षण बोजड होऊन जाते. शेतीमातीला शिक्षणात प्राधान्य नाही.

शाळेच्या बाबतीत खाजगी शाळांत भरमसाठ फी आकारली जाते. तिथे कपडे, बुट विकले जातात. शिक्षण महाग बनते. शिक्षण क्षेत्रात स्वप्न दाखवून व्यवसाय केला जातो. शिकवणी, क्‍लासेस, ट्यूशन्सच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक होते. अनेकविध मार्गाने पैसा हा अंतिम ध्येय बनविले जाते. मुलांची स्पर्धा लावली जाते. रेस का घोडा बनवतात. वैयक्तिक भावभावनांना किंमत राहत नाही. शिक्षणात मानवी जीवनमुल्यांचे स्थान राहत नाही. मुलांच्या करिअर निवडीसाठी पालकांवर अतिरिक्त तणाव असतो. योग्य दिशा न मिळाल्याने मानसिकता राहत नाही. दिवास्वप्ने दाखवून आर्थिक लूट केली जात आहे. पालकांना आपल्या मुलांचे भविष्य महत्वाचे वाटते. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राथमिक स्तरापासूनच पालक भितीने ग्रासलेले आढळतात. सर्वांसाठी मोफत शिक्षण ही घोषणा हवेतच विरते. शाळेत फी दिली नाही म्हणून प्रवेश नाकारलेले अनेक उदाहरणे आहेत. शिक्षण व्यवस्था धनिकांच्या ताब्यात जाऊ पाहत आहे. प्रात्यक्षिक पेक्षा थेअरी जास्त महत्वाची वाटते. अशा संक्रमण काळात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण व्हायला हव्यात. भारतीय शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक दर्जेदार शिक्षणाचा समावेश करून परदेशात शिक्षणासाठी न जाता परदेशातील गुणवत्तेपेक्षा भारतीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवल्यास परदेशी विद्यार्थी भारतात अधिक शिकतील अशी व्यवस्था निर्माण करणे महत्वाचे आहे. ते एक आव्हान आहे. आपल्या व्यवस्थेने ते स्विकारायला हवे. हे सर्व एका दिवसात शक्‍य नाही. त्या दिशेने वाटचाल तर करू शकतो ना? नवतरूणांचे लोंढे तयार करून त्यांना गैरमार्गास लावणारांची कमी नाही. तरूण हा सर्वात जास्त प्रवास करतो. त्यास खरी अर्ध्या तिकीटाची गरज आहे. पंधरा ते पस्तीस वयाच्या युवकास प्रवास सवलतीची खरी गरज आहे. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न होणे महत्वाचे आहे. विमासंरक्षणही मिळावे. शेतकरी व त्याचा पाल्य यांना जातीभेद न करता सवलत देता येईल.

शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्षे याच गर्तेत अडकून पडलेला. निसर्गाच्या लहरीपणावर त्याची मदार असते. जमिनीत बियाणं रूजविण्यापासून सुरू होणारा, पीक आडतीवर नेई पर्यंतचा प्रवास अनाकलनिय असतो. जमिन तयार करणे. महागडी बियाणे खरेदी करणे, रासायनिक खत खरेदी करणे. पिकांना पाणी देणे, निगा राखणे ते आडतीवर जाते तेव्हा पडलेले भाव या सर्व व्यवस्थेचे प्रश्न गहन तर आहेत. त्याचबरोबर ते पिढी बरोबर आलेले आहेत. कृषक समाजाच्या व्यथा आजच्या काळात तीव्र बनल्या आहेत. आधुनिकीकरणांमुळे ग्रामजीवन उध्वस्तेकडे वाटचाल तर करत नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे. शेतकरी संघटित झाले, तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारा आहे कोण? प्रश्नाचे उत्तर कुणीच नाही, हेच आहे, सगळेच शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. दुर्दैव हेच आहे, की या देशात जातीय व धार्मिक घटनेच्या बाबतीत गळा काढणाऱ्या लोकांची रिघ लागते, परंतु शेतकऱ्यांच्या मरणावर साधे दोन अश्रू डोळ्यातून गाळणारा कुणीच नाही.

भारतासारख्या कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणाऱ्या देशात आज शेतकऱ्यांची जी भयानक अवस्था मायबाप सरकार नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे ती भारताला अत्यंत लाजिरवाणी आहे. कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणाऱ्या असा उल्लेख करण्याचे कारण हेच की खरोखरच आपला देश आता कृषीप्रधान आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली दिसते. आपल्या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याची परिस्थिती गेली कित्येक दशके राज्य करत असलेल्या या मायबाप नावाच्या सरकारने इतकी हलाखीची करुन ठेवली आहे की त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत कृषीप्रधान वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या कृषीप्रधान देशाची अवस्था गेल्या काही वर्षात दलालप्रधान करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे आणि त्यामुळे समस्त शेतकरी वर्गाने त्यांचा भव्य-दिव्य सत्कार केला पाहिजे.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे 
(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी ‘प्रभात’चे व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)