#क्रीडांगण :अंजूम, अपूर्वीचे लक्ष्य आॅलिंपिक पदकाचे (भाग १)

-अमित डोंगरे

आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी यंदा अनपेक्षित यश मिळवले. त्यातही महिला खेळाडूंनी वरचष्मा ठेवला. भारताला मिळालेल्या एकूण पदकांपैकी सत्तर टक्के पदके ही महिला खेळाडूंनी मिळवली आहेत. आता या खेळाडूंबरोबरच जागतिक स्पर्धेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंनाही टोकीयो-2020 ऑलिंपीकचे स्वप्न पडू लागले आहे. अंजूम मोदगिल आणि अपूर्वी चंडेला या दोघीनी जागतिक नेमबाजी स्पर्धेत सरस कामगिरी करत ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे.

भारताच्या अंजूम मोदगिल आणि अपूर्वी चंडेला यांनी सोमवारी जागतिक अजिंक्‍यपद नेमबाजी स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात सरस कामगिरी करत सन 2020 च्या ऑलिंपिकसाठी कोटा मिळवला. महिला गटात अंजुमने 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकाची कमाई केली, तर अपूर्वी चौथ्या स्थानावर राहिली. आगामी टोकियो ऑलिंपिकसाठी कोटा मिळवणाऱ्या अंजूम आणि अपूर्वी या भारताच्या पहिल्या दोन नेमबाज ठरल्या आहेत. अंजूमच्या रूपाने भारताने या स्पर्धेत वरिष्ठ गटात पदकांचे खाते उघडले. रविवारी भारताला ज्युनियर गटात दोन पदके मिळाली होती.

आठ महिलांच्या अंतिम फेरीत 24 वर्षीय अंजूमने या प्रकारात 248.4 गुण मिळवून रौप्यपदकावर नाव कोरले. कोरियाची हाना इम हिने 251.1 गुणांसह सुवर्णपदक मिळवले, तर कोरियाच्याच युनही जंगने(228.0) ब्रॉंझपदकाची कमाई केली. चौथ्या स्थानावरील अपूर्वीने 207 गुण मिळवले. 24 शॉटसच्या अंतिम फेरीत अपूर्वीने पहिल्या पाच शॉट्‌समध्ये 52.2 गुण मिळवले. यावेळी अंजूमनेही कामगिरीत सातत्य राखले होते. यानंतर हाना, अंजूम, जुंग, अपूर्वी, लिन यिंग-शिन यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. स्पर्धेतील 18 व्या शॉटनंतर अपूर्वी तिसऱ्या स्थानावर होती, तर जुंग चौथ्या स्थानावर होती. 19 व्या शॉटला अपूर्वीला केवळ 9.6 गुणच घेता आले आणि नंतर ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.

अंजूमलाही 19 व्या आणि 20 व्या शॉट्‌सला अनुक्रमे 9.8 आणि 9.7 गुणच मिळवता आले. यानंतर 23 व्या शॉट्‌सलाही तिला केवळ 9.9 गुणच घेता आले आणि सुवर्णपदकापासून ती मागे राहिली. तत्पूर्वी, पात्रता पेरीत अंजूम चौथ्या, तर अपूर्वी सहाव्या स्थानावर होती. दरम्यान, 10 मी. एअर रायफल पुरूष गटात भारताच्या दीपक कुमारने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अंतिम निर्णय संघटनेचा

या प्रकारात एका देशाला दोन ऑलिंपिक कोटे असतात. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेची (आयएसएसएफ) टोकियो ऑलिपिंकमध्ये प्रवेश मिळवण्यासाटीची ही पहिली स्पर्धा आहे. यातून 15 प्रकारांतून 60 नेमबाजांना ऑलिंपिक कोटा मिळेल. भारताच्या अंजूम आणि अपूर्वी यांनी कोटा प्राप्त केला असला, तरी नियमानुसार अंतिम निर्णय भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचा असेल.

निवड चाचणी आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील नेमबाजांची कामगिरी लक्षात घेऊन ऑलिंपिकमध्ये कोणाला पाठवायचे याचा निर्णय संघटना घेते. चंडिगडच्या अंजूमने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये रौप्यपदक मिळवले असून, याच वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये तिने रौप्यपदक पटकावले आहे. गेल्या वर्षी ब्रिस्बेन येथे झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेतही तिने रौप्यपदकाची कमाई केली होती.

अंजूम, अपूर्वीचे लक्ष्य आॅलिंपिक पदकाचे (भाग २) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)