जपानच्या ध्वजाला दक्षिण कोरियाकडून पुन्हा आक्षेप 

सेऊल: पुढील आठवड्यात जेजू बेटानजीक होणाऱ्या सागरी युद्धसरावामध्ये सहभागी होणाऱ्या जपानच्या युद्धनौकांवरील उगवत्या सूर्याचे चिन्ह असलेला जपानचा राष्ट्रध्वज जपानने काढून घ्यावा, अशी मागणी दक्षिण कोरियाने पुन्हा एकदा केली आहे. जपानच्या या राष्ट्रध्वजाच्या चिन्हासह जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते. त्यामुळे हा ध्वज युद्धगुन्ह्याचे प्रतिक असल्याचे दक्षिण कोरियातील प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे. जेजू येथील सागरी युद्धसराव 10 ते 14 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे.
जपानने द्वितीय महायुद्धाच्या काळात दक्षिण कोरियावर किती अत्याचार केले होते. तसेच दक्षिण कोरियातील वसाहतींवर दडपशाही केली होती, याची जपानने आठवण ठेवावी, असे दक्षिण कोरियाचे विदेश मंत्री कांग क्‍योंग यांनी गुरुवारी सांगितले.
या सागरी युद्धसरावामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 14 देशांच्या युद्धनौकांवर केवळ आपले राष्ट्रध्वज आणि दक्षिण कोरियाचा ध्वज लावावेत, अशी सूचना दक्षिण कोरियाने केली आहे. जपानकडून “उगवत्या सूर्या’चे चिन्ह असलेला ध्वज असलेल्या युद्धनौका या सरावात सहभागी होऊ नयेत, याचसाठी ही सूचना दिली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)