कोपरगावकरांचा काळेंच्या आंदोलनाला पाठिंबा

सलग तिसऱ्या दिवशी काळेंचे धरणे आंदोलन सुरूच

कोपरगाव – कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार नंबर व पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू होते. जोपर्यंत साठवण तलावाच्या कामाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोपरगावकरांनी देखील आता या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

नगरपालिकेकडून कोपरगावकरांना सध्या 12 दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोपरगावकरांना पाणीटंचाई जाणवणार नाही यासाठी गेल्या काही वर्षांपासून काळे यांनी चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे कामाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा अशी आग्रही मागणी केली होती. पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्याची तयारी दाखविलेल्या समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्‍शन कंपनीने साठवण तलावाचे काम करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काळे यांनी आता हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यासाठी काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मंगळवारी काळे यांच्याबरोबर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व गायत्री कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे व्यवस्थापक तात्याराव डुंगा यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत साठवण तलावाच्या बाबतीत कोपरगाव नगरपालिकेची उदासीनता व गायत्री कन्स्ट्रक्‍शन कंपनीवर असलेल्या राजकीय दबावामुळे कोणताही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे जोपर्यंत साठवण तलावाच्या कामाबाबत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही व धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा काळे यांनी घेतला आहे.

या धरणे आंदोलनाला कोपरगाव शहरातून मोठा पाठींबा मिळत आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह लोकस्वराज्य संघटना, व्यापारी महासंघ व लायन्स क्‍लब, जैन महावीर समाज, लायनेस क्‍लब, वकील महासंघ, वंचित बहुजन आघाडी, हमाल पंचायत, शीख समुदाय, लायन्स क्‍लब महिला, रयत सेवक मित्र मंडळ, लाड सुवर्णकार समाज , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मेडिकल असोसिएशन संघटना आदी संघटनांनी पाठींबा दिला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)