कोपरगाव शहर अतिक्रमणांच्या विळख्यात

नगरपालिका अधिकाऱ्यांची जोळेझाक : सुमारे 400 अतिक्रमणे वाढण्याची शक्‍यता


-शंकर दुपारगुडे

कोपरगाव – कोपरगाव शहराला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पालिका अधिकारी ते काढण्यासाठी का डोळेझाक करीत आहेत ? रस्त्यांवर अनेक ठिकाणी राजरोस हातगाड्या, टपऱ्या लावल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्याने चालनेही नागरिकांना कठिण झाले आहे. काही ठिकाणी तर मोकळ्या जागेत अनधिकृत वस्तीच तयार झाली असून, तेथे वीजपुरवठा व नळ जोडही देण्यात आले आहेत. त्यामुळे या अतिक्रमणांकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. एकाने अतिक्रमण केले की दुसरा तयार आहेच. कोणी राजकीय पक्षाचा आधार घेतो, तर कोणी वैयक्तीक दमबाजीवर अतिक्रमण करतो. त्यामुळे अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक हातगाड्या रस्त्याला खेटून लावल्या जातात. काहींनी रस्त्याच्या कडेलाच बेकायदेशीर टपऱ्या थाटल्या आहेत. मात्र रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी साधा भाजीपाला जरी विकला, तरी त्याच्याकडून पालिका कर्मचारी त्यांच्याकडून पावती फाडतात. मात्र राजरोस अतिक्रमणे करणाऱ्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात.

पालिका कर्मचारी याचा अहवाल पालिकेला रोज देतात. मात्र तरीही पदाधिकारी व मुख्याधिकारी गप का? अनेक विभागांत प्रमुख अधिकारी नाहीत, हे कारण पुढे करून मुख्याधिकारी व नगराध्यक्ष या प्रकाराला किती पाठिशी घालणार? जे अतिक्रमणे करीत आहेत, त्यांना किमान लेखी अथवा तोंडी सूचना देऊन अतिक्रमण वाढणारा नाही याची तरी दखल घ्यावी.

नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अंतर्गत राजकारणाने पोखरलेली पालिका म्हणून कोपरगाव नगरपालिकेची नवीन ओळख निर्माण झाली आहे. पालिकेत कामकाज करण्यासाठी अधिकारी नाहीत. याचा गैरफायदा काही नागरिकसुद्धा घेत आहेत. कोपरगाव शहराला अतिक्रमणांचा विळखा निर्माण झाला आहे. शहरातील अतिक्रमणे वाढण्यात जसा प्रशासनाचा हात आहे, तसा आजी-माजी नगरसेवकांचाही आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची शिस्तप्रिय नगाराध्यक्ष, अशी ओळख असताना बेशिस्त काम करणाऱ्यांवर ते मेहेरबान का होत आहेत. त्यांना काही अडचण आहे की त्यांना त्यांच्या अधिकारांचा वापर करायचा नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

शहराची विकसीत शहर होण्याऐवजी टपरीचे शहर, अशी ओळख होत आहे. मोठे व्यापारी अनेक अडचणींमुळे इतर शहरांत व्यवसाय करण्यासाठी निघून जात आहेत. 2011 मध्ये शहरातील तेराशे छोटी-मोठे अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविली होती. त्या कामासाठी पालिकेला अंदाजे 35 लाख रुपये खर्च आला होता. नागरिकांच्या खिशातील कर रूपाने आलेला पैसा, शहर विकासाच्या कामास वापरण्याऐवजी अतिक्रमणे काढण्यासाठी वापरण्याची वेळी पालिकेवर आली होती.

आता पुन्हा तीच वेळ येण्याचे चिन्ह दिसत आहे. मधल्या काळात अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाचा वचक होता. मात्र गेल्या वर्षापासून शहरात अतिक्रमण करणाऱ्यांत शर्यत सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेचे कर्मचारी जाब विचारण्यास गेले असता, त्यांना दमदाटी, शिवीगाळ प्रसंगी हाणामारी करण्याचेही प्रकार घडले आहेत. तर काही जण दुसऱ्यांची अतिक्रमणे काढा, मग माझे अतिक्रमण काढा, असा सल्लाही देत आहेत. त्यातच प्रमुख अधिकारी नसल्याने पालिकेच्या कामकाजाचे तिनतेरा वाजले आहेत.

आता पुन्हा नव्याने शहरात अंदाजे 400 अतिक्रमण वाढले. भविष्यात अतिक्रमण काढण्यावरून राजकारण होणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकमेकांवर राजकीय चिखलफेकही होईल. विविध आरोपांच्या फैरी झाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार होण्यास वेळ लागणार नाही.

शहरातील अतिक्रमणे राजकीय कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वाढले, तरी अतिक्रमण करणायावर कडक कार्यवाही करण्याचा अधिकार नगराध्यक्ष – मुख्याधिकारी यांना आहे. सध्या दोघेही कोणतीच कारवाई करीत नाहीत. राजकीय चिखलफेक करून फक्त टीका-टिप्पणी करण्यापेक्षा शहर सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. हातगाडी व्यावसायिकांसाठी स्टॉल देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र तो अद्यापही कागदावरच आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या मध्यभागी फ्रूटमार्केट बांधण्यात आले आहे. अनेक फळ विक्रेत्यांसाठी हे मार्केट सोयीचे आहे. केवळ लालफितीमुळे हे मार्केट धूळखात पडून आहे. पूर्वीच्या नगरसेवक-नगराध्यक्षांनी कामात निष्काळजीपणा केला. त्यामुळे कोपरगावच्या जनतेने विजय वहाडणे यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले. गेल्या दोन वर्षांपासून फ्रूटमार्केटवर कुठलाही निर्णय झाला नाही. या मार्केटमधील गाळेवाटप झाले नाही. त्यामुळे खोका शॉप तयार केले जात नाहीत. ज्यांच्याकडे पूर्वी सत्ता होती त्यांनी ते केले नाही आणि आत्ताचे सत्ताधिश याकडे लक्ष देणास तयार नाहीत, अशी स्थिती असेल, तर कोपरगाव शहराचा कधी विकास होईल.

कोण चूक, कोण बरोबर यापेक्षा काय केले आणि काय करण्याची गरज आहे, हे अधिक महत्वाचे आहे. कोण विकास कामात आडवे येते, यापेक्षा कोण अधिकारवाणीने विकासासाठी प्रयत्न करतात, हे महत्त्वाचे आहे. कोपरगावच्या विकासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांना नागरिकांची सहमती असणार, यात शंका नाही. कोपरगावच्या नागरिकांची अंतर्गत मतभेद विसरून एकदिलाने शहराचा विकास झाला पाहिजे, अशी आशा आहे. ती पूर्ण होईल काय?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)