सेल्फी काढताना सतर्कता बाळगावी – वनपरीक्षेत्र अधिकारी
मंचर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण खोऱ्यात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सध्या हा धबधबा दुथडी भरून वाहत आहे. भीमाशंकरपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंढवळ येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
आदिवासी भागातील भीमाशंकर रस्त्यावर ठिकठिकाणी ओढे नाल्यांसह, घोडनदी, बुब्रा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भीमाशंकरला आलेले भाविक कोंढवळ धबधब्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सध्या सर्वत्र सेल्फिचा छंद वाढल्याने येथे येणारे हौसी पर्यटक सेल्फी घेण्याचा मोह टाळू शकत नाहीत; परंतु हा परिसर आतिवृष्टीचा आहे, तर पावसाने गवत व शेवाळावरुन पडल्यास सेल्फी जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी सेल्फी काढताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन घोडेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी केले आहे.