कोल्हारवर कधीही कोसळू शकते शिळा

‘मेरी’चा प्राथमिक निष्कर्ष; माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती

प्रदीप पेंढारे

नगर – कोल्हार कोल्हुबाई (ता. पाथर्डी) येथील डोंगरापासून वेगळी झालेली शिळा कधीही शाळा आणि गावावर कोसळू शकते, यावर महाराष्ट्र इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (मेरी) प्राथमिक तपासणीत शिक्कामोर्तब झाले आहे. शिळा काढून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यास माळीणसारखी (पुणे) पुनरावृत्ती येथे होऊ शकते. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनासह “मेरी’च्या प्रमुखांनी कोल्हुबाईच्या डोंगराची नुकतीच पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

स्थानिक रहिवाशी शिवाजी पालवे यांनी याबाबत तक्रार केली होती. दोन वर्षांपासून ते याबाबत पाठपुरावा करत होते. विभागीय आयुक्तांकडेदेखील त्यांनी तक्रार केली होती. ही शिळा थेट गावावर कोसळू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंतची शाळा आहे, याकडेदेखील लक्ष वेधण्यात आलेले आहे. या बाबत “प्रभात’ने आवाज उठवला. “जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिळा कोसळण्याची भीती’ या मथळ्याखाली कोल्हार कोल्हुबाईच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली.

नाशिक येथील “मेरी’ आणि पुणे येथील “जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ यांच्याकडे जिल्हा प्रशासनाने तपासणीसाठी पाठपुरावा केला. भूजल विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांचा अहवाल त्यासाठी पूरक ठरला. या अहवालाची दखल घेत “मेरी’ च्या शास्त्रज्ञांनी कोल्हार कोल्हुबाईला पाच सप्टेंबरला भेट दिली. “मेरी’च्या चारूलता चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे समन्वयक डॉ. वीरेंद्र बडदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रदीप नागरगोजे, स्थानिक प्राधिकरणाचे अधिकारी आणि रहिवाशी या वेळी उपस्थित होते.

या अधिकाऱ्यांनी डोंगराची पाहणी केली. डोंगरावर मंदिराचे करण्यात आलेले बांधकाम, त्याचा पाया, त्याचा डोंगराचा दगड आणखी ठिसूळ होण्यावर झालेला परिणाम या बाबी ही या पाहणीत विचारात घेण्यात आल्या. डोंगरावरच्या ज्या शिळा निसटत आहे, तेथेही पाहणी करण्यात आली. या शिळा ज्या मतीवर आधारलेल्या आहेत, तिचेही नमुने घेण्यात आले. तेथील छायाचित्र घेण्यात आले आहे. डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे अंतरही मोजण्यात आले आहे. शिळा कधी निखळू शकतात, याचाही प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार त्या शिळा कशापद्धतीने काढून घेण्यात येतील, याचीही चर्चा या अधिकाऱ्यांमध्ये झाली.

“मेरी’च्या अधिकाऱ्यांनी या शिळा काढून घेता येतील का, असाही प्रस्ताव ठेवत त्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या प्रमुखांशी चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापनने त्यानुसार कार्यवाहीच्या वेगवेगळ्या बाजू तपासून पाहू, असे “मेरी’च्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. “मेरी’च्या अधिकाऱ्यांनी छायाचित्र काढून घेण्याबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला हा शिळा कोसळून हानी करण्याअगोदर काही प्राथमिक उपाय सुचविले आहेत. त्यात डोंगर पायथ्याशी चर खोदून ठेवणे, नैसर्गिकरित्या ढासळणाऱ्या शिळा काढून घेता येतील का ते पाहणे, जाळी ठोकून घेणे आदींचा समावेश आहे.

ठिसूळ भूस्तरावर शिळा

मेरी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पाहणीत डोंगरावरील शिळा या “वेदर्ड जिओलेटीक बेसाल्ट’वर उभ्या आहेत. हा भूस्तर मुरुमापेक्षा कमकुवत आहे. त्यावर या शिळा आहेत. भीज पावसामुळे हा खडक लगेचच ठिसूळ होतो. अशा ठिसूळ भागावर या शिळा सरकल्या आहेत. आजूबाजूला शिळाचे काही भाग कोसळल्याचेदेखील दिसते. या वर्षी येथे जोराचा आणि भीज पाऊस झालेला नाही. त्यामुळे अजून तरी कोणतीही दुर्घटना झालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)