कोल्हापूर – भाजपा- शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-मित्रपक्षांची आघाडी या दोन्हींचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातून होणार हे आता निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आघाडी आणि युती मध्ये दिग्गज नेत्यांना आणण्यात स्पर्धा लागली आहे. युतीच्या सभेला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री येणार आहेत तर आघाडीच्या सभेसाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. तर युतीचे उमेदवार म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याचबरोबर प्रचार सभेला दोन्ही बाजूने कोल्हापूरचे नाव निश्चित झाले. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाकडे देशाचं लक्ष लागून आहे. युतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.
तर आघाडीकडून शरद पवार आणि प्रियांका गांधी यांना प्रचाराच्या शुभारंभासाठी आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता नेत्यांना कोल्हापुरात आणण्यावरही स्पर्धा सुरू झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदानाला सव्वा महिना बाकी आहे. त्यामुळे उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी बांधून प्रचारात उतरले आहेत. त्यातच आघाडी आणि युती यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार असल्याने या जागेकडे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे देखील लक्ष लागून आहे. या दोन्ही प्रचारसभांमध्ये कोण-कोणावर आरोपांच्या फैरी झाडणारे याकडे सर्वसामान्य नागरिकांचे देखील लक्ष आहे.