कोहलीची झुंज अपयशी; इंग्लंडचा भारतावर 31 धावांनी विजय

बर्मिंगहॅम: भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या भूमीवर पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरत असताना कर्णधार विराट कोहलीची एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली आणि चौथ्याच दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 31 धावांनी निराशाजनक पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना येत्या 9 ऑगस्ट रोजी लॉर्डस मैदानावर सुरू होत आहे.
इंग्लंडचा पहिला डाव 287 धावावर रोखणाऱ्या भारताने पहिल्या डावांत 274 धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांवर रोखला होता. विजयासाठी 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताचा डाव आज उपाहारापूर्वीच 54.2 षटकांत 162 धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
.
पहिल्या डावांत 149 धावांची झुंजार खेळी करणाऱ्या विराट कोहलीने दुसऱ्या डावांत 93 चेंडूंत 4 चौकारांसह 51 धावांची खेळी करीत भारताचा पराभव लांबविला. परंतु बेन स्टोक्‍सने विराट कोहलीला 47व्या षटकांत तंबूत परतविल्यानंतर भारताचा पराभव ही केवळ औपचारिकताच होती.
हार्दिक पांड्याने 31 धावांची खेळी करीत दिलेली लढत भारताचा पराभव टाळण्यासाठी पुरेशी नव्हती. बेन स्टोक्‍सने 40 धावांत 4 बळी घेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 2 बळी घेत त्याला साथ दिली.
पहिले तीन दिवस अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांत इंग्लंडला माफक धावसंख्येवर रोखताना चमकदार कामगिरी बजावली. मात्र सर्व प्रमुख भारतीय फलंदाज अपयशी ठरल्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज विरुद्ध विराट कोहली अशीच झुंज रंगली.
मात्र विराटने सर्वोत्तम प्रयत्न करूनही या लढतीत भारताचा पराभव टाळण्यात त्याला अपयश आले. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत कोहलीने दोन्ही डावांत शतक झळकावूनही भारताला अशाच प्रकारे पराभव पत्करावा लागला होता.
अष्टपैलू कामगिरी करीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सॅम करनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. करनने पहिल्या डावांत 24 व दुसऱ्या डावांत 65 धावा केल्या. तसेच करनने दुसऱ्य डावांत अदिल रशीद व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या साथीत केलेल्या भागीदाऱ्याच निर्णायक ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. करनने पहिल्या डावांत 4 व दुसऱ्या डावांत एक बळीही घेतला.
त्याआधी विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी कालच्या 5 बाद 110 धावांवरून आज सकाळी पुढे सुरू केला. मात्र अँडरसनने कार्तिकला बाद करीत भारताला पहिला धक्‍का दिला. कार्तिकने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्‍सने विराट कोहली आणि महंमद शमी यांना एकाच षटकांत बाद करून इंग्लंडचा विजय नजीक आणला. ईशांत आणि हार्दिक पांड्या यांनी काही वेळ लढत दिली. परंतु रशीदने ईशांतला (11) आणि बेन स्टोक्‍सने पांड्याला बाद करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक-

इंग्लंड- पहिला डाव- 89.4 षटकांत सर्वबाद 287 (जो रूट 80, जॉनी बेअरस्टो 70, कीटन जेनिंग्ज 42, सॅम करन 24, बेन स्टोक्‍स 21, रविचंद्रन अश्‍विन 62-4, महंमद शमी 64-3, ईशांत शर्मा 46-1, उमेश यादव 56-1), इंग्लंड- दुसरा डाव- 53 षटकांत सर्वबाद 180 (सॅम करन 63, बेअरस्टो 28, डेव्हिड मेलन 20, ईशांत शर्मा 51-5, रविचंद्रन अश्‍विन 59-3, उमेश यादव 20-2) वि.वि.
भारत- दुसरा डाव- 54.2 षटकांत सर्वबाद 162 (विराट कोहली 51, हार्दिक पांड्या 31, दिनेश कार्तिक 20, बेन स्टोक्‍स 40-4, स्टुअर्ट ब्रॉड 43-2, अँडरसन 50-2), भारत- पहिला डाव- 76 षटकांत सर्वबाद 274 (विराट कोहली 149, शिखर धवन 26, मुरली विजय 20, हार्दिक पांड्या 22, सॅम करन 74-4, अदिल रशीद 31-2, अँडरसन 41-2, बेन स्टोक्‍स 73-2).
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)