ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन ; उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ
जागतिक ज्ञानाचे केंद्र म्हणून भारताचे पुनरुत्थान होण्याचा काळ
शिकण्याची नवी केंद्रे शोधण्याची गरज

मुंबई: ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन राहणार असून, लोकांचे राहणीमान सुधारण्यात ज्ञानच महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले. भारताने या संधीचा फायदा घेऊन, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरेल, अशा प्रकारे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे पुनरुत्थान केले पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईतल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अभिमत विद्यापीठाच्या 16 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या समारंभात आज उपराष्ट्रपतींनी 8 जणांना पीएचडी, सहा जणांना एम फिल आणि 29 विद्यार्थ्यांना एम.एससी पदवी प्रदान केली.

वसाहतवादी मनोवृत्तीतून शिक्षण व्यवस्थेने बाहेर पडले पाहिजे. व्यवस्थेने इतिहास वास्तवदर्शी पद्धतीने शिकवला पाहिजे. शिक्षण केवळ रोजगारासाठी नाही. शिक्षण व्यवस्थेने व्यक्तीला ज्ञानाने सक्षम केले पाहिजे आणि नीरक्षीरविवेकबुद्धीने तो संपन्न व्हायला हवा. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि सर्व स्तरावर सर्वसमावेशक विकास व्हावा व कुठलाही भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. जागतिक ज्ञानाचे केंद्र म्हणून भारताचे पुनरुत्थान होण्याची वेळ आता आली आहे. हे घडण्यासाठी अध्यापन केंद्रांनी विशेषत: विद्यापीठांनी बौद्धिक आदानप्रदानाची सर्वोत्तम केंद्रे म्हणून स्वत:ला नव्याने घडवले पाहिजे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

विकासातल्या आव्हानांवर ज्ञानाद्वारेच मात करता येऊ शकेल, असे सांगून संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची आणि नाविन्यपूर्ण शोधांना चालना देण्याची गरज आहे. वर्ष 2030 मध्ये भारत 10 ट्रिलिअन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी वर्षाला किमान 7 टक्के विकासदर राखणे आवश्‍यक आहे. जर आपण हे साध्य करु शकलो तर जागतिक बॅंकेच्या कनिष्ठ उत्पन्न गटातून उच्च-मध्यमवर्गीय उत्पन्न गटात दाखल होऊ शकतो. यासाठी अपुऱ्या सार्वजनिक सेवा, प्रदूषण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातल्या समस्या, जमीन, मजूर व वित्तीय बाजारपेठांमधल्या त्रुटी यासारख्या अनेक अडथळ्यांवर मात करणे आवश्‍यक आहे. असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भविष्यात कामगार कौशल्याच्या मागणीबाबत उद्योग आणि सेवा क्षेत्राकडून नाट्यमय बदल घडू शकतो. आपल्या शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी या बदलत्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी कौशल्य विकासाची गती महत्वाची आहे. स्वयंरोजगाराला आपण चालना दिली पाहिजे. स्वयंसहायता गट अधिक सक्षम केले पाहिजेत, ग्रामोद्योगांना चालना दिली पाहिजे आणि गावांचा विकास केला पाहिजे. विकसनशील देशांतर्गत आणि इतर देशात नव्या बाजारपेठा शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहर आणि गावातली दरी आपण मिटवली पाहिजे. ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवण्याचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरवले पाहिजे. शहरी क्षेत्राप्रमाणे ग्रामीण भागातील जीवनमान सुकर होण्यासाठी पेयजल, पथदिवे, शिक्षण, आरोग्यनिगा आणि दूरसंवाद सेवा पुरवण्याविषयीच्या सामाजिक समावेषनाची उद्दिष्टे त्यांनी मांडली.


रोजगाराचा मुख्य स्रोत अजूनही शेती

भारतीय कृषी क्षेत्राचे महत्वाचे वैशिष्ट्‌य म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांकडे (सुमारे 90 दशलक्ष) कृषी क्षेत्र अत्यंत कमी आहे. बहुतांश कृषी क्षेत्र 1 हेक्‍टरहून कमी आहे. बहुतांश शेतकरी आपला माल घाऊक बाजारपेठांमध्ये विकतात. परिणामी किरकोळ बाजारातल्या चढ्या भावांचा फायदा शेतकऱ्यांना मिळतच नाही. या क्षेत्रात अल्प श्रम उत्पादकतेचे एक महत्वाचे कारण बाजाररचना आहे. कृषी क्षेत्रात श्रम उत्पादकता सुधारण्यासाठी कृषी मूल्यवर्धन/कृषी प्रक्रिया यांची गरज आहे. बाजारपेठेत शेतकऱ्यांची भाव करण्याची क्षमता सुधारण्यासाठी नावीन्यपूर्ण संस्थात्मक रचनांचीही आवश्‍यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)