शस्त्र जमा करण्याकडे परवानाधारकांचा कानाडोळा

आचारसंहिता लागू झाल्यानंतर 1059 पैकी केवळ 600 जणांनी जमा केली शस्त्रे

पिंपरी – निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकृत परवाना असलेली शस्त्रे जमा करण्याचे आदेश असतानाही शहरातील निम्म्याहून अधिक शस्त्र परवानाधारकांनी आपली शस्त्रे जमा करण्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे. आचारसंहिता लागू होऊन आता 15 दिवसापेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप निम्मीही शस्त्रे जमा झालेली नसल्याने पोलीस ही शस्त्रे केव्हा जमा करुन घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 59 लोंकाकडे परवाना असलेली अधिकृत शस्त्रे आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ही शस्त्रे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतर आत्तापर्यत 600 जणांनी शस्त्रे जमा केली असून उर्वरीत लोकांची शस्त्रे अद्याप जमा केलेली नाहीत. पोलिसांकडून शस्त्रे जमा करण्याचे काम सुरु असले तरी बहुतांश राजकारणी लोकांनीच अद्याप शस्त्र जमा केलेली नसल्याने राजकारणी आचारसंहिता कधी पाळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ज्या व्यक्‍तीच्या जिवाला धोका आहे, अशा व्यक्‍तींना शस्त्र बाळगण्यासाठी परवाना मिळत असतो. शस्त्र परवाना मिळाल्यानंतर निवडणुकीचा काळात किंवा इतर विदारक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही शस्त्रे पालिस प्रशासनाकडे जमा करावी लागतात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नियमानुसार परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्यांनी आपली शस्त्रे पोलीस आयुक्‍तालयाकडे जमा करायची असतात. यामध्ये, ज्यांच्या जिवाला धोका आहे अशा तसेच बॅंकर्स आणि इतर क्षेत्रातील व्यक्‍तींना पोलीस प्रशासन आवश्‍यकतेनुसार सुट देते. मात्र, इतर सर्व लोकांनी आपली शस्त्रे जमा करणे गरजेचे असते.

पिंपरी-चिंचवड शहरातील शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून शस्त्रे जमा करण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 600 जणांकडील शस्त्रे जमा केली असून आणखी काही शस्त्रे जमा होतील. बॅंकर्स तसेच जिवतीला धोका असणाऱ्या लोकांना शस्त्रे जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे. बहुतांश लोकांनी आपली शस्त्रे जमा केली आहेत.
– शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)