सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी किशोर शिंदे

खा. उदयनराजेंकडून अभिनंदन, विशेष सभेत झाली निवड

सातारा – सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे किशोर शिंदे यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत निवड करण्यात आली. नामनिर्देशन प्रक्रियेनंतर दुपारी दोन वाजता शिंदे यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी किशोर शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

सातारा पालिकेत कारभारी बदलाची जी पंधरवड्यापासून चर्चा होती. त्याच्या पहिल्या टप्प्याला शुक्रवारी मूर्त रुप मिळाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून यापूर्वीच किशोर शिंदे यांच्या नावाला शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हिरवा कंदिल मिळाला होता. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या विशेष सभेत निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली.

पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष माधवी कदम यांनी कामकाज पाहिले. सकाळी दहा ते बारा या दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करणे त्यानंतर साडेबारा वाजता अर्ज छाननी, प्रत्यक्ष माघारीसाठी मुदत आणि दुपारी दोन वाजता उपनगराध्यक्ष निवड असा कार्यक्रम होता.

सकाळी सव्वाअकरा वाजता किशोर शिंदे आपल्या समर्थकांसह पालिकेत दाखल झाले. त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दोन प्रतीत नगराध्यक्ष माधवी कदम यांना सादर केले. या अर्जावर सूचक श्रीकांत आंबेकर व अनुमोदक म्हणून राजू भोसले यांनी स्वाक्षरी केली. छाननी प्रक्रियेत पीठासन अधिकाऱ्यांनी किशोर शिंदे यांचा एकमेव अर्ज वैध ठरवला.

दुपारी झालेल्या विशेष सभेत तांत्रिक प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर नगराध्यक्ष माधवी कदम यांनी उपनगराध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. सातारा विकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी या निवडीचे बाके वाजवून स्वागत केले. किशोर शिंदे यांचे हार घालून व पेढे भरवून स्वागत करण्यात आले. किशोर शिंदे यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत पालिकेबाहेर फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)