पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी किशोर शिंदेंचे नाव निश्‍चित

सातारा – सातारा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी किशोर शिंदे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. वचकाअभावी सैराटलेल्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे आव्हान उपनगराध्यक्षपदा पुढे असणार आहे. सातारा विकास आघाडी अंतर्गत असणाऱ्या गटबाजीला मिटवून सर्व सदस्यांची एकत्र मोट बांधण्याचे अवघड दिव्य पार पाडावे लागणार आहे.

समन्वय आणि विकासाचा अट्टाहास
सर्व आघाडी नगराध्यक्षांच्या केबिनला बसून सखोल चर्चा घडवण्याची खरी कसरत उपनगराध्यक्षांना करावी लागणार आहे. नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याशी कारभाराची लय जुळेल अशी आशा व्यक्त होत आहे. शिंदे हे अभ्यासू व संयमी नेतृत्व ओळखले जाते. किंबहुना पहिल्या अडीच वर्षातच त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड होणे अपेक्षित होते. मात्र नेत्यांच्या सूचनेनुसार किशोर शिंदे यांनी शांत राहणे पसंत करत बांधकाम सभापती म्हणून जवाबदारी पार पाडली. आता आपल्या कामाचा स्वतंत्रपणे ठसा उमटवण्याची संधी शिंदे यांना मिळाली आहे शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांची जल्लोषाची तयारी केली आहे.

गेल्या अडीच वर्षात सातारा विकास आघाडीची गटबाजी, फोफावलेली टेंडरशाही, पालिकेचा विस्कटलेला कारभार विरोधकांची मुस्कटदाबी, नगराध्यक्षांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे सुरू असलेले कोल्ड वॉर, राजकीय दबावाचे हतकंडे यामुळे पालिकेत सातारा विकास आघाडीचा फार लोकाभिमुख कारभार झालाच नाही. उपनगराध्यक्षांचे शॅडो कॅबिनेट एवढे टोकाचे होते की अनेक चुकीचे पायंडे पालिकेत पडले.

कोणताही धोरणात्मक निर्णय उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये ठरवायचा आणि सहीला तो नगराध्यक्षांच्या केबिनला पाठवायचा हा धरसोडपणाही पालिकेने पाहिला आहे. सुहास राजेशिर्के यांच्या कारकिर्दीत साविआत उभी फूट पडली. किशोर शिंदे हे समन्वयक म्हणून उत्तमपणे काम करू शकतात. सातारा शिक्षण मंडळाच्या डिजिटल शाळांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावायचा आहे.

पालिका शाळांची पटसंख्या वाढवणे या गोष्टींचा कानोसा शिंदे यांना घ्यावा लागणार आहे. पालिकेच्या व्यापारी संकुलांची भाडेवाढ, चतुर्थ वार्षिक पाहणी, मालमत्तांचे ई मॅपिंग, काही सैराटलेल्या कर्म चाऱ्यांना पायबंद, बांधकाम विभागातील मोकाट अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप या गोष्टींवर उपनगराध्यक्षांना विशेष काम करावे लागणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here