दंतचिकित्सा विभागात ‘खो-खो’चा खेळ

जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकार

रोज “इडली खा स्पर्धा’

जिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर रोज साडेनऊच्या दरम्यान काही जणांचे इडली प्रेम प्रचंड उतू जाते. वरिष्ठांच्या गुडबुकमध्ये जाण्याचा मार्ग हा व्हाया इडली सांबारमधून आहे, हे काही जणांनी ताडले आहे. किंबहुना त्याच्या कितीतरी रंगीत तालमीसुध्दा झाल्या आहेत. मॅडमची इडलीची खव्वयेगिरी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तितक्‍याच खमंगपणे चर्चेची फोडणी देऊन चघळली जाते. जिल्हा रूग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमधून मॅडमसाठी येणारा स्पेशल ब्रेकफास्ट ओपीडीच्या वेळेत ब्रेक घेऊन केला जातो. हा ब्रेक इतका मोठा असतो, की बाहेर ताटकळलेले रुग्ण वैतागून जातात. भले ओपीडीत गर्दी असली तरी इडली खा स्पर्धा करण्यासाठी दहा मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागात विनाकारण रेंगाळणारे इडल्या चापत गप्पांचा फड रंगवतात हा दुसरा वादाचा मुद्दा आहे. एखाद्या महिलेच्या वेषभूषेवर सोशल मीडिया अथवा शाब्दिक चर्चेतही फालतू कमेंट पास करण्याचा थिल्लरपणा सुरू झाल्याने महिला डॉक्‍टरांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचा दंतचिकित्सा विभाग विदूषकी चाळ्यांचे केंद्र बनला आहे. कंत्राटी डॉक्‍टरांच्या अंगावर कामाचा बोजा टाकून स्वतः वरिष्ठांच्या कार्यालयात चकाट्या पिटणाऱ्यांची संख्या वाढल्याने या ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची ससेहोलपट होत आहे. या विभागात दंत उपचारासाठी सध्या एकच खुर्ची उपलब्ध असल्याने या विभागाची अवस्था “असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाला क्रांतिअग्रणी नाना पाटील यांचे नाव आहे. कारभार मात्र ढिसाळ नियोजनाचा उत्तमं नमुना असल्याने बिचारा रुग्णालयात येणारा रुग्ण नाहक भरडला जात आहे.

समांतर खुर्चीची महत्वाकांक्षा ठेवणाऱ्या काही पुढारी डॉक्‍टरांच्या आश्रयाने हे जिल्हा रुग्णालय आपल्या तीर्थरुपांची खाजगी जहागिरी असल्याप्रमाणे येथे अविर्भाव असतो. साधन सुविधांची कमतरता आणि दंतचिकित्सा विभाग सोडून नको त्या विभागात विनाकारण कुचाळक्‍या करण्याच्या सवयींमुळे या विभागात कमीत कमी साठ पैकी वीसच पेशंटवर उपचार होतात. दंतचिकित्सेची पदव्युत्तर पदवी घतलेली एक महिला वैद्यकीय अधिकारी व दोन पदवी घेतलेले असे तीन डॉक्‍टर उपलब्ध आहेत. मात्र दोन कंत्राटी व एक कायमस्वरूपी अशी व्यवस्था असल्याने येथे रुग्णांना नाडणारी मनमानीसुध्दा जास्त आहे.

किरकोळ उपचारांसाठीसुद्धा रुग्णांना चार वेळा हेलपाटे मारायला लावायची येथील परंपरा अगाध असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची योग्य मार्गदर्शनाअभावी त्रिस्थळी यात्रा सुरू असते. वरिष्ठ पदाची दादागिरी आणि गटबाजी प्रचंड आणि त्यातही सिनिअर आणि ज्युनियर्स डॉक्‍टरांचा जनरेशन गॅप प्रचंड असल्याने रुग्णसेवेचे हे पवित्र केंद्र अंर्तगत लाथाळ्यांचा अड्डा बनला आहे. मात्र इथे कामच होत नाही, असे नाही. काही कार्यकुशल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दंतचिकित्सा विभाग डेंटल चेअर खराब असतानाही नेटाने चालवला आहे. ज्या रूग्णांना 15-15 दिवस वाट पाहायला लागायची त्या रूग्णांना अवघ्या तीनच दिवसात पुनर्तपासणीसाठी बोलावले जाते.

रूट कॅनॉल, मायनर सर्जिकल प्रोसेस या सगळ्याच छोट्या मोठ्या चिकित्सांची जबाबदारी एका महिला डॉक्‍टरकडे आहे. आणि त्या ती जबाबदारी नेटाने सांभाळत आहेत. दंतचिकित्सा विभागात आणखी एका डेंटल चेअरची गरज आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी परवानगी देवूनही कोरेगाव प्राथमिक केंद्रातील अडगळीत पडलेली डेंटल चेअर साताऱ्यात आणण्यासाठी हस्ते-परहस्ते टाळाटाळ केली जाते. यामागेही काही डोकेबाज अधिकाऱ्यांचा कंपू आहे. चमकोगिरीत पुढे पुढे करणारे काही सिनिअर्स कंत्राटी तत्वावरच्या डॉक्‍टरांना दुय्यम वागणूक देऊन त्यांना जाहीर कार्यक्रमात मुद्दाम मागील खुर्चीवर बसवतात. कौतुकासाठी सिनिअर्स आणि कामाच्या ओझ्यासाठी ज्युनिअर्स हा दंतचिकित्सा विभागाचा सरळ सरळ फंडा आहे.

मी माझ्या ओपीडीत मनाला येईल तेव्हा जाणार या मनमानीमुळे दंतचिकित्सा विभागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या कारभाराचे पोस्टमॉर्टम करण्याची वेळ ओढावली आहे. सिनिअर डॉक्‍टर ज्युनियरला दुय्यम समजून वाट्टेल तशी वागणूक देतात, कामांपेक्षा पदाचा रूबाब दाखवण्याची खोड येथे जात्याचं असल्यामुळे दंतचिकित्सा विभाग पुरेशा कामकाजाअभावी क्षमता असतानाही प्रचंड अडचणीत आला आहे. स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयात सकाळी नऊ वाजता हजर राहण्याचा दंडक घालून घेतला आहे. तरीसुध्दा काही मांदावलेले वरिष्ठ दहाशिवाय ओपीडीत अवतरत नाही ही रूग्णालयाची प्रचंड मोठी शोकांतिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)