कुस्तीत महाराष्ट्राकडून हरयाणाचे आव्हान मोडीत

वेताळ शेळके, महेश पाटील, सचिन दाताळ यांना सुवर्ण

पुणे – महाराष्ट्राच्या मल्लांनी घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा घेत हरयाणाच्या मल्लांचे आव्हान मोडून काढले आणि कुस्तीत सोनेरी हॅट्ट्रिक साधली. फ्रीस्टाईल प्रकारात त्यांच्या वेताळ शेळके (80 किलो), महेश पाटील (51 किलो) व सचिन दाताळ (60 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांचे सहकारी संजय मिश्रा (71 किलो) व अजय वाबळे (65 किलो) यांना रौप्यपदक मिळाले तर कालीचरण सोलनकर (71 किलो) याला ब्रॉंझपदक मिळाले. मुलींमध्ये स्वाती शिंदे हिने ब्रॉंझपदक जिंकले.

अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करणाजया वेताळ याने 80 किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या कृष्णन याच्यावर 8-3 असा सफाईदार विजय मिळविला. लढतीनंतर आनंद व्यक्त करताना वेताळ याने आपल्या यशाचे श्रेय काका पवार यांना दिले. तो म्हणाला, त्यांनी दिलेल्या सूचना मी तंतोतंत पाळल्या व कोणतेही दडपण न घेता ही लढत खेळली. त्यामुळेच मी या लढतीत वर्चस्व गाजवू शकलो.

कोल्हापूरच्या महेश पाटील याला 51 किलो गटात हरयाणाच्या विपिनकुमार याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. ही लढत त्याने 2-1 अशी जिंकली. लढतीनंतर तो म्हणाला, ही लढत जिंकण्याबाबत मला खात्री होती. तथापि मी सुरुवातीपासून थोडासा सावध खेळ केला. येथील प्रेक्षकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला व सोनेरी कामगिरी करू शकलो.

कात्रज येथील मामासाहेब मोहोळ केंद्रात शिकणाऱ्या सचिन दाताळ याने 60 किलो गटाच्या अंतिम लढतीत जयदीप याला 7-2 असे हरविले. तो भारती विद्यापीठ प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे. 71 किलो गटाच्या अंतिम लढतीत संजय मिश्रा याला हरयाणाच्या विजयकुमार याने 6-3 असे हरविले. याच गटात कालीचरण सोलनकर या महाराष्ट्राच्या मल्लाने ब्रॉंझपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. 65 किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या परविंदर याने अजय वाबळे याचा 9-3 असा सहज पराभव केला. मुलींच्या 50 किलो विभागात स्वाती शिंदे हिने ब्रॉंझपदक पटकाविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)