अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्राला चार पदके

पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता

पुणे – महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 21 वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात रौप्यपदक पटकाविले. तसेच 100 मीटर मुलींच्या गटात प्रांजली पाटील हिने रौप्यपदकाच्या कमाई केली. महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ऍथलेटिक्‍समध्ये शानदार कामगिरी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अडथळ्यांच्या शर्यतीत 21 वर्षाखालील गटात अल्डेनने 14.10 सेकंदात अंतर पार करीत केरळचा सी मोहम्मद (14.11 से.) व महाराष्ट्राचा अभिषेक उभे याला (14.32 से.) मागे टाकले. अभिषेकला कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. अल्डेन हा मुंबईत दयानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो अभियांत्रिकी दुस-या वर्षात शिकत आहे. त्याने रांची येथे झालेल्या कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते, त्यावेळी त्याचा राष्ट्रीय विक्रम थोडक्‍यात हुकला होता.

धैर्यशील गायकवाड याने 17 वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले तसेच अभिजीत नायर याने 21 वषार्खालील गटात गोळाफेकीत ब्रॉंझपदक पटकाविले. सतरा वषार्खालील मुलांच्या उंच उडीत महाराष्ट्राच्या आधार दत्ता याने ब्रॉंझपदकाची कमाई केली. तर, महाराष्ट्राच्या ताई बामने हिने पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले.

भरपूर प्रेक्षकांच्या उत्साहात ऍथलेटिक्‍स स्पर्धांना प्रारंभ झाला. मुलांच्या 17 वषार्खालील गटात सौरभ याने धावण्याचे उत्तम कौशल्य दाखवित पंधराशे मीटर्सचे अंतर चार मिनिटे 22.15 सेकंदात पार केले. उत्कंठापूर्ण शर्यतीत त्याने तामिळनाडूच्या बी.माथेश (4 मिनिटे 22.22 सेकंद) याच्यावर मात केली. हरयाणाच्या अजयकुमार याने ब्रॉंझपदक मिळविताना हे अंतर 4 मिनिटे 23.56 सेकंदात पूर्ण केले.

मुलींमध्ये 17 वर्षाखालील गटात तामिळनाडूच्या थबीथा पी.एम. हिने 14.14 सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील (14.49 से.) हिने रौप्यपदकाची कमाई केली. प्रांजली ही मुंबई येथे विरेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

शाळेत असताना बालासार या क्रीडा शिक्षकांकडूनच तिला ऍथलेटिक्‍सची प्रेरणा मिळाली. सध्या ती 10 व्या इयत्तेत शिकत असल्यामुळे एकाच वेळी दहावीचा अभ्यास व ऍथलेटिक्‍सचा सराव याचा कसाबसा ताळमेळ राखत आहे. गेले दीड महिना विविध स्पर्धांच्या चाचणी व सरावांमुळे तिला खूपच प्रवास करावा लागला होता. त्याचाही परिणाम माझ्या कामगिरीवर झाला, अन्यथा मी सुवर्णपदक घेतले असते, असे तिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)