खेड बुद्रुक ग्रामस्थांची मतदानाकडे पाठ

मतदान केंद्रावर शुकशुकाट : पाण्यासाठी आधीच दिला होता बहिष्काराचा इशारा

लोणंद  – लोणंद लगतच असणाऱ्या खेड बुद्रुक, ता. खंडाळा या गावात सध्या भयंकर दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल होऊ लागले आहेत. धोम बलकवडीचे पाणी तुळशी वृंदावन धरणापर्यंत सोडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून दि. 22 एप्रिल पूर्वी पाणी न सोडल्यास संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

सध्या खेड बु. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. निरा देवधर धरणाच्या निर्मिती होताना खेड बुद्रुक गावातील शेतजमीन या धरणातील पुनर्वसितांसाठी शासनाने घेतल्या. या बदल्यात धोम बलकवडी व नंतर निरा देवघरचे पाणी देण्याचे शासनाने मान्य केले होते. दहा वर्षापूर्वी निरा देवघर व धोम बलकवडी धरण व पोट पाट पूर्ण होऊनही खेड बु. गाव पाण्यापासून वंचित आहे.

सध्या शेतीसाठी पाणी नसून पिण्याच्या पाण्याचेही भयंकर परस्थितीती निर्माण झाली आहे. या गावातील पशुधन धोक्‍यात आले आहे. बळीराजा कर्जात बुडाला असून या निवडणुकीच्या निमित्ताने तो पेटून उठला असून प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला पाण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून विनवणी करुनही या प्रश्‍नाकडे कोणीही गांभीर्याने न पाहिल्याने गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तो 99.5 टक्के आमलात आणला आहे. सध्या या मतदान केंद्रावर फक्त अर्धा टक्का मतदान झाले असून मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. गावातील मंडळी कोणासही मतदान करून देत नसून इच्छुक काही मतदान करणाऱ्या मोजक्‍या मतदारांना पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने 26 मतदारांनी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)