खटाव तालुका दुष्काळग्रस्तच शासन स्तरावर मात्र उपेक्षाच

सरकारधार्जिणे तथा विरोधी नेत्याकडून गंधारीची भूमिका

सातारा – खटाव तालुक्‍यातील जनतेला वरुणराजाने हुलकावण्या देऊन दुष्काळाच्या खाईत ढकलले हे वास्तव चित्र आहे. अस्मानी संकटांशी तालुकावासीय सामना करत असतानाच सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीतून खटाव तालुक्‍याला वगळून सुलतानी संकट लादल्याची जोरदार चर्चा आहे. आमदारांची मांदियाळी असणाऱ्या व सत्ताधारी पक्षात तथाकथित हेवीवेट नेतेमंडळी व इतर नेत्यांची भाऊगर्दी असतानाही तालुका दुष्काळी यादीतून वगळला जाणे हे सर्वच नेत्यांचे अपयश असून नेत्यांना फक्त जनतेचे पाठबळ हवे जनतेच्या सुख-दुःखाचे कोणालाच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुष्काळी तालुक्‍यांच्या यादीत सातत्याने राज्यातही वरच्या स्थानावर विराजमान असणाऱ्या खटाव-माण या तालुक्‍यां पैकी राज्य शासनाने खटावच्या कपाळावरील दुष्काळी कलंक पुसून अकलेचे तारे तोडून खटावच्या जनतेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून सुलतानी संकटाची भर घालत खटाव तालुक्‍यातील जनता पाकिस्तानधार्जिणे असल्यासारखी दुजाभावाची वागणूक दिल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत .तर सरकारधार्जिण्या नेत्याबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जनद्रोह केला असल्याच्या कडवट प्रतिक्रिया सामान्यातून व्यक्त होत आहेत.

खटाव तालुक्‍याच्या चोहोबाजूनी माणदेशातील गावांनी वेडलेल्या, खटाव तालुक्‍याशेजारील दुसऱ्या जिल्ह्यातील तसेच स्व जिल्ह्यातील सर्व गावे तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आली. एवढेच नव्हे तर तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून ओरड करणाऱ्या कराड तालुक्‍याचा या यादीत समावेश होतो मात्र खटाव तालुक्‍याला या यादीत स्थान न मिळणे हा या तालुक्‍यावर घोर अन्याय आहे.

हा अन्याय का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जातोय दुष्काळी यादीसाठी कोणते व कसे निकष लावले आहेत ?तालुका महसूल प्रशासनाचा अहवाल मंडलनिहाय स्वतंत्रपणे घेण्यात आला होता का? ऐन पावसाळ्यातही तालुक्‍यातील काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा होत होता हे प्रशासनाने नजरेआड केले का? पावसाने आर्धी अधिकच सरासरी गाठली असतानाही तालुका दुष्काळाच्या यादीतून दूर राहतोच कसा ?तालुका दुष्काळी यादि पासून दूर राहण्यास कोण कारणीभूत ठरलेत त्या अधिकारी नेतेमंडळीनी तालुक्‍यातील जनतेचा द्रोह केला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बांधवा सह सामाजिक संघटना व सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.

सरकार धार्जिण्या नेत्यासह, तालुक्‍यातील नसलेल्या परंतु खटावच्या जनतेचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या त्रिमूर्ती आमदारांनी तसेच हेवीवेट माजी आमदार व इतर नेत्यांनीही आपले वजन वापरून तालुका दुष्काळी यादीत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे का घातले नाही ?आत्ता दुष्काळी यादित तालुका न आल्याचे खापरे ही नेते मंडळी एकमेकावर फोडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.या नेतेमंडळीचे तालुक्‍यातील जनतेप्रती खरे खरेच प्रेम असेल तर जनतेसाठी एकीची वज्रमुठ दाखवून तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करून घेऊन जनतेवर झालेला अन्याय दूर करून आपण जनतेसाठीच नेतृत्व करीत आहोत हे कृतीतून दाखवून द्यावे.

वास्तविक तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय तालुक्‍यातील ब्रिटिश कालीन मायणी तलावासह कानकात्रे विखळे सहअनेक तलाव कोरडे ठणठणीत आहेत .जलयुक्त शिवारात तयार झालेली भांडी रिकामी आहेत,पाणी पातळी कमालीची घटली आहे. येरळा नदी कोरडी आहे .गावोगावी पाणीटंचाईची भीषणता वाढतच आहे. आजही काही गावांना टॅंकरने पाणी पुरवठा होतो आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे .रब्बी हंगाम हातचा गेला तर खरीप हंगामाच्या अशा पूर्णपणे धूसर झालेल्या आहेत. बळीराजा सर्वच बाजूने आर्थिक संकटात सापडलाय.

अस्मानी संकटात अडकलेल्या जनतेला सुलतानी संकटाचा तडाखा बसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झालेला आहे.
नुकताच कृषी आयुक्तांनी तालुक्‍याचा प्रत्यक्ष दौरा केला आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी खटाव तालुक्‍यात  दुष्काळसदृष्य स्थिती असल्याचा वास्तव अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे समझल्याने जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झाली असली तरी दुष्काळ जाहीर होणार का ? पुन्हा शासनाची कमिटी तालुक्‍यात येऊन पाहणी करून कालापव्यय करीत तालुक्‍याच्या तोंडाला पाने पुसली जाणार याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)