सातारा पालिकेच्या प्रशासनात खांदेपालट

सातारा – सातारा पालिकेच्या प्रशासनात नव्या चेहऱ्यांची मोठी खांदेपालट झाली आहे. राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले नव्या दमाचे तब्बल चौदा अधिकारी सेवेत दाखल झाले आहेत. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली नव्या-जुन्या चेहऱ्यांची टीम तयार झाली असून पालिकेतील रिक्‍त पदांचा बराचसा बॅकलॉग भरून निघाला आहे.

अ वर्ग आणि तब्बल पावणेदोनशे कोटीचे बजेट असणारी सातारा पालिका जिल्हयातील अन्य तेरा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सातत्याने मार्गदर्शक ठरते. मात्र अधिकारी व पदाधिकारी यांच्या कारभारामुळे सातारा पालिका सातत्याने चर्चेत असते. मात्र बऱ्याच वर्षाची अपुऱ्या मनुष्यबळाची ओरड आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास विभागाने संपुष्टात आणली. सेवेत रुजू असणाऱ्या 545 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल तीस टक्के कर्मचारी गेल्या तीन वर्षात टप्याटप्याने सेवानिवृत्त झाले. आणि येत्या तीन महिन्यात आणखी दहा टक्के कर्मचारी पुढील सहा महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्याचा सर्वाधिक ताण हा वसुली, बांधकाम, पाणी पुरवठा, व आरोग्य विभागावर पडत होता. मात्र ही समस्या आता पूर्णपणे निकाली निघाली आहे.

गेल्या दोन महिन्यात नगरविकास विभागाने सातारा पालिकेचा चेहरामोहरा बदलत तब्बल सत्तावीस कर्मचारी नेमले. आस्थापनांच्या ज्या बदल्या डिसेंबर महिन्यात झाल्या त्यातील पालिकेचेच जुने नऊ कर्मचारी पुन्हा साताऱ्यात रुजू झाले. आणि नवीन चौदा कर्मचाऱ्यांपैकी बारा नवीन कर्मचारी हजर झाल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजाला गती आली आहे. यातील काही नवे उमदे आणि तरूण चेहरे येत्या बावीस फेब्रुवारी रोजी राज्यसेवा परीक्षेच्या पुढील टप्प्यासाठी व्यस्त असल्याने अद्याप हजर नाहीत. 2012 साली अतिरिकत मुख्याधिकारी म्हणून आशिष लोकरे हजर झाले होते. मात्र त्यांचा कालावधी अगदीच अल्प म्हणजे अवघ्या अकरा महिन्याचा ठरला.

लोकरे यांच्या बदलीनंतर ते पद रिक्तच राहिले मात्र नव्याने झालेल्या नियुक्‍यांमध्ये संचित कृष्णा धुमाळ हे उपमुख्याधिकारी व हिम्मत संभाजी पाटील हे मुख्य लेखाधिकारी म्हणून हजर झाले आहेत. हे मोठे उलटफेर प्रशासनाच्या रचनेत झाले असून धुमाळ यांना प्रशासकीय व वसुलीची जवाबदारी तर पाटील यांना लेखा विभागाची पाटीलकी देण्यात आली आहेत. सातारा पालिकेचे 2018-19 चे बजेट हे पाटील यांच्या स्वाक्षरीने निघणार मात्र, लेखा विभागात अपेक्षित बदल दिसत नसल्याने सर्व जण राजकीय आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. कल्याणी भाटकर या अ वर्ग लेखापरीक्षक, व नौशाद काझी हे विद्युत अभियंता म्हणून निवड झाली तरी हजर झालेले नाहीत.

नवीन निवड झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे

प्रतिक श्रीराम जाधव – स्थापत्य अभियंता, नौशाद शहाजहान काझी – विद्युत अभियंता, अस्मिता अरूण यादव – संगणक अभियंता, हिम्मत संभाजी पाटील – लेखाधिकारी, कल्याणी सुरेश भाटकर,- लेखापरीक्षक, ज्ञानदेव काशिनाथ गंधाले, – सहायक लेखापरीक्षक, संचित धुमाळ – कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, प्रणिता सुनिल शेंडगे, प्रणव गणेश पवार, प्रसन्ना बाळासाहेब जाधव, प्रज्ञा चव्हाण,- सर्व प्रशासकीय अधिकारी, अक्षय कुमार साळुंखे , स्वानंद सतीश मोगरकर – सहायक नगररचनाकार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)