खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीत अटक

“केसीएफ’च्या सदस्यांना पुन्हा एकत्र करण्याची होती योजना

नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य आणि या संघटनेचा एकेकाळचा म्होरक्‍या जर्नैल सिंग भिंद्रनवालेच्या सहकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. “आयएसबीटी’ दिल्लीत आपल्या सहकाऱ्यांना 12 मार्चला भेटायला आला असताना त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. गुरसेवक सिंग (वय 53) असे या दहशतवाद्याचे नाव असून तो खलिस्तान कमांडो फोर्स (केसीएफ)चा सदस्य आहे. “केसीएफ’चा म्होरक्‍या परमजीत सिंग पंजावाद याच्या सूचनेवरून “केसीएफ’च्या सदस्यांना पुन्हा एकत्र केले जाण्याची योजना गुरसेवक सिंग करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

गुरसेवक सिंग हा देशातील तिहार आणि अन्य तुरुंगात असलेल्या जगतार सिंग हवारा आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या सदस्यांच्याही संपर्कात होता. याशिवाय पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांच्याही तो संपर्कात राहिला होता.
गुरसेवक हा यापूर्वी जवळपास 50 दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. त्यामध्ये खबरी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्या, बॅंकांवरील दरोडे, पोलिस स्टेशनची लुटालुट आणि अन्य गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त अजित कुमार सिंगला यांनी सांगितले. गुरसेवक सिंग देशाईल वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये तब्बल 26 वर्षे राहिला होता.

दरोडे, हत्या, शस्त्रांची तस्करीची पार्श्‍वभुमी
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील राजकोट गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुरसेवक सिंग याचा मोठा भाऊ स्वरण सिंग हा देखील भिंद्रनवालेच्या दहशतवादी गटाचा सदस्य होता. गुरसेवक हा 1982 साली या गटामध्ये सामील झाला. 1984 साली भिंद्रनवाले मारला गेल्यावर गुरसेवक पाकिस्तानमध्ये पळून गेला. तेथे “आयएसआय’च्या मदतीने दहशतवादी प्रशिक्षण घेतले आणि “आयएसआय’ला सहकार्यही केले. या काळात मनवीर सिंग चेहडूने स्थापन केलेल्या “केसीएफ’मध्ये तो सामील झाला. या संघटनेच्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये तो सामील झाला. त्याने आणि अन्य सहकाऱ्यांनी हिंद समाचार वर्तमान पत्राचे संपादक रमेश छांदेर यांची जालंधरमध्ये हत्या केली होती. पंजाबचे माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्यावरही त्याने प्राणघातक हल्ला केला होता.

“केसीएफ’चे म्होरके जर्नल लाभ सिंग आणि सदस्य गुरिंदर पाल सिंग भोला, स्वर्णजीत सिंग यांना पोलिसांच्या कोठडीतून पळवून नेण्यसाठी गुरसेवकने पंजाब पोलिसांच्या 8 कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला होता. त्याने पोलिसांची वाहने, रायफली, रिव्हॉल्व्हर, कार्बाईन आणि दारुगोळाही पळवून नेला होता. त्याने पाकिस्तानातून एके47 – रायफलींची तस्करी करण्याचाही कट केला होता. मात्र तो अपयशी झाल्याने 9 जुलै 1998 रोजी त्याला अटक झाली.

तिहार तुरुंगातमध्ये 18 वर्षे काढल्यानंतर 2010 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतरही तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला. त्याला 2014, 2015 आणि 2016 साली तीनवेळा लुधियाना पोलिसांनी दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यानंतर 2017 त्याला पुन्हा शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक झाली. त्याच्याविरोधात पतियाळा हाऊस न्यायालयात खटला सुरु आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही लागू करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)