खलिस्तानी दहशतवादाचे सावट (अग्रलेख) 

पंजाबात काल निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला झाला. त्यात तीन जण ठार आणि वीस जण जखमी झाले. या हल्ल्याचे धागेदोरे अजून मिळालेले नाहीत पण प्राथमिक स्वरूपात जो तपास झाला आहे, त्याचा सारा रोख खलिस्तानी दहशतवादाकडे जात असल्याचे संबंधीत बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही देशासाठी नवी धोक्‍याची घंटा आहे. पंजाबात जर पुन्हा खलिस्तानी दहशतवाद डोके वर काढीत असेल तर ती साऱ्या देशासाठीच एक चिंतेची बाब ठरेल. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद पूर्ण इतिहास जमा झाल्याचे वाटत असतानाच या दहशतवादाचे अस्तित्व अधून-मधून जाणवत राहिले आहे. विदेशातील भूमीवरून ही चळवळ जिंवत ठेवली गेली आहे.

अमेरिका आणि युरोपातील काही संघटनांनी खलिस्तानचा विषय जीवंत ठेवला होता.कॅनडातील काही खलिस्तानवादी गटही आपले अस्तित्व गेली तीन चार दशके टिकवून आहेत. पण त्याची ताकद केवळ विषय जीवंत ठेवण्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पहिले नव्हते. त्याची तशी गरजही नव्हती. पण ही चळवळ पुन्हा जोर धरू लागली असल्याची चुणुक निरंकारी भवनातील हल्ल्याने पहायला मिळाली आहे. शांत आणि प्रगतीच्या मार्गावर असलेला पंजाब पुन्हा या धगधगत्या चळवळीकडे वळू लागतो की काय ही धास्ती सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. पंजाबच्या भूमीवरून सक्रिय होऊ पहाणारी ही खलिस्तानी दहशतवादाची चिंगारी सुरक्षा यंत्रणांसाठीही झोप उडवणारी ठरणार आहे. संपुर्ण देशाला या चळवळीच्या हिंसाचाराची धग सोसावी लागली आहे. हा दहशतवाद आटोक्‍यात आणण्यासाठी देशाची बरीच वर्षे खर्ची पडली आहेत. अनेकांच्या प्राणाची आहुती त्यात द्यावी लागली आहे. एक तत्कालिन पंतप्रधान आणि एका माजी लष्करप्रमुखांसह हजारो बळी या चळवळीने घेतले. हा फार जुना इतिहास नाही. 80 च्या दशकात खलिस्तानी चळवळीने जो उच्छाद मांडला होता, त्याचे निराकरण करण्यासाठी शेवटी सुवर्णं मंदिरावर लष्करी कारवाई करावी लागली होती.

एखाद्या धार्मिक स्थळावरील कारवाईत लष्कराचा वापर करावा लागण्याची स्वतंत्र भारतातील ही एकमेव घटना आहे. या कारवाईत भिंद्रानवाले यांचा खात्मा झाल्यानंतरच ही फुटीरवादी चळवळ संपुष्ठात आली होती.जे. एफ. रिबेरो आणि केपीएस गिल यांच्या सारख्यांनी पंजाबात यासाठी मोठेच योगदान दिले आहे. तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनीही कसोशिचे प्रयत्न करून हा विषय वाढणार नाही याची दक्षता घेतली होती. राजीव-लोगोंवाल करार हा पंजाबात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाची पायाभरणी होती. भारतावरील खलिस्तानी फुटीरतावादाचे एक मोठे संकट फार मोठी किंमत देऊन आपण संपवले आहे. पण खलिस्तानवाद्यांच्या विदेशातील हस्तकांनी ही चळवळ पुर्ण विझु दिली नव्हती. या विषयाची धग त्यांनी कायम ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्यानंतर हा दहशतवाद आता पुन्हा पंजाबच्या भूमीवर अवतरला असेल तर पंजाब सरकार पेक्षा केंद्र सरकारलाच अधिक गांभीर्याने जागरूकता बाळगावी लागेल.

पंजाबात कॉंग्रेस सरकार आहे म्हणून या राज्याला केवळ तेथील कॉंग्रेस सरकारच्या भरवश्‍यावर सोपवून केंद्र सरकारला गप्प बसता येणार नाही. पंजाबच्या भूमीवर खलिस्तानी पुन्हा सक्रिय झालेच असतील तर त्यावर केंद्र सरकारने चौफेर लक्ष घालायला हवे आहे. पण अजून तरी निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याविषयी केंद्र सरकार फार तत्परतेने हालचाल करताना दिसले नाही. हा राजकारणाचा किंवा राजकीय डावपेचाच विषय असू शकत नाही याचे भान त्यांना राखावेच लागेल. सध्या सीबीआय या सरकारी यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. देशातल्या दोन राज्यांनी अधिकृतपणे सीबीआयला आपल्या हद्दीत प्रवेश करायलाच बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार पंजाब मधील या नव्या घडामोडींविषयी सावधगिरी बाळगणार असेल तर ती अंगावर आल्याशिवाय राहणार नाही.

एनआयए सारख्या यंत्रणांवर या नव्या आव्हानाबाबत कारवाईची जबाबदारी सोपवावी लागेल. देशात सध्या नक्षलवादाचे सावट कायम आहेच. इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनांवर सध्या बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे ही समाधानाची बाब आहे. पण त्याची भरपाई आपल्याला नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानी दहशतवादाने करावी लागणार असेल तर तेही धोकादायकच आहे. अर्थात अजून निरंकारी भवनावरील हल्ल्याची पुर्ण खातरजमा व्हायची आहे. तोंडावर फडके बांधुन आलेल्या दोन युवकांनी हे घृणास्पद कृत्य केले आहे.त्यांचीच अजून ओळख पटलेली नाही, त्यावरून पंजाबात खलिस्तानी पुन्हा सक्रिय झाले आहेत असा निष्कर्ष एकदम काढता येणार नाही हेही खरे आहे. पण म्हणून ही घटना क्षुल्लक ठरवता येत नाही.

भविष्यातील मोठ्या आपत्तीची ही नांदी ठरू नये इतकीच सर्वांची अपेक्षा आहे. पूर्वीच्या खलिस्तानी चळवळीला पाकिस्तानचे मोठे पाठबळ होते. पण पाकिस्तानची सध्याची स्थिती पहाता त्यांना ही चळवळ पुन्हा पुरस्कृत करणे आर्थिकदृष्ट्या परडणारे नाही. त्यातच पाकिस्तानात इम्रानखान यांची नवीन राजवट आली आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणेला प्राधान्य द्यायची भूमिका घेतली आहे त्यामुळे भारतात नव्याने खलिस्तानीवादी चळवळीला ते पाठबळ देतील असे निश्‍चीतपणे म्हणता येत नाही. पण पंजाबात सत्तेपासून दूर गेलेल्या राजकारण्यांनी केवळ तेथील कॉंग्रेस सरकारला त्रास देण्याच्या उद्देशाने या चळवळीला खतपाणी घालून आगीशी खेळता कामा नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)