खलिदा झियांच्या चिरंजीवांना जन्मठेप 

सन 2004 साली हसिनांवर केला होता ग्रेनेड हल्ला 
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचे चिरंजीव तारीक रहमान यांना येथील ट्रायल कोर्टाने सन 2004 च्या ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्या ग्रेनेड हल्ल्यात 24 जण ठार तर सुमारे पाचशेवर लोक जखमी झाले होते जखमींमध्ये स्वता पंतप्रधान शेख हसिना यांचाही समावेश होता. त्यावेळी त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या व त्यांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे शेख हसिना यांना अंशत बहिरेपणा आला आहे. 21 ऑगस्ट 2004 रोजी अवामी लीगच्या जाहीर सभेच्यावेळी हा हल्ला झाला होता.
बांगलादेशात येत्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. त्या पार्श्‍वभुमीवरच हा निकाल आल्याने त्याचा खलिदा झिया यांच्या राजकीय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तथापी तारीक रहमान यांना जरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी ते सध्या लंडन मध्ये राजकीय आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच हा खटला चालवला गेला. त्यांच्या मातोश्री व माजी पंतप्रधान खलिदा झिया यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती त्यावेळी बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख पद त्यांचे चिरंजीव तारीक रहमान हे सांभाळत होते.
रहमान यांच्या बरोबरच अन्य 18 जणांनाही या प्रकरणात कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून माजी मंत्री लुटफोझ्झमन बाबर यांच्यासह 19 जणांना यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 49 आरोपी होते. रहमान यांनी या हल्ल्याचा कट रचला आणि हरकतउल जिहाद अल इस्लामी या संघटनेच्या गनिमांनी तो अंमलात आणला. या प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी रहमान यांना बांगला देशात आणण्याचा प्रयत्न सरकार करेल अशी ग्वाही बांगलादेशचे गृहमंत्री असदुझमान खान कमाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)