अपुऱ्या बळावर खाकीची कसरत

पोलिसांवर वाढला ताण; कौटुंबीक स्वास्थ हरवल्याची भावना

सातारा/गोडोली – समाजात शांतता नांदावी म्हणून सतत काम करणाऱ्या पोलिसांची अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोठी कसरत होत आहे. एकीकडे गुन्हेगारी कारवायांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे त्याचा बिमोड करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलिस दादांचे मानसिक व कौटुंबीक स्वास्थ बिघडल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून मनुष्यबळ वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सातारा शहरात रोज आंदोलने-निदर्शने आणि व्हीआयपी दौरे सुरु असतात. यासह आपत्कालीन परिस्थिती वारंवार उदभवते. त्यातच गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. मात्र, मनुष्यबळ कमी झाले असल्याने वर्दीतल्या माणसांचा ताण कमी होण्याएवजी तो वाढताना दिसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे तिचा बिमोड करणारी यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे. तरीही सातारा पोलिसांनी कधीही आपल्या समस्या कर्तव्याआड आणल्या नाहीत. यामुळेच शिस्तप्रिय पोलीस दलात 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस दादा व ताईंना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सिव्हील हॉस्पिटल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वनविभाग आणि बहुतांश कार्यालये जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सातारा शहरात आहेत.

साहजिकच या कार्यालयांच्या प्रमुखांना पोलीस संरक्षण आलेच. यासह कोर्ट पैरवी, आरोपी पार्टी, उच्च न्यायालयातील खटले आणि प्रतिनियुक्तीवर पाठवलेले कर्मचारी. त्यातच सतत सुरू असलेली आंदोलने-मोर्चे हे सुरु असताना गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळेनासा झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षकांसह दोनशे कर्मचारी आणि 18 अधिकारी होते. मात्र, सध्या 150 कर्मचारी आणि 09 अधिकारी कर्तव्य बजावत आहेत. पूर्वी सुरु असणारी बीट मार्शल सेवा आता बंद पडली आहे. शहर पोलीस ठाण्याअंतर्गत रविवार पेठ, सदरबझार, संगमनगर, एमआयडीसी, गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट या पोलीस चौक्‍या असून बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांअभावी त्या बंद असतात. एका बाजूला गुन्हेगारी वाढत असताना दुसरी बाजू पाहता अपुऱ्या मनुष्यबळावर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची कसरत पोलिस दलात सुरु आहे. याचा विचार करून जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी जादा कुमक देण्याची मागणी पोलीस वर्तुळातून दबक्‍या आवाजात जोर धरू लागली आहे.

ताण गमावतोय हक्काची नाती
आदेशाचा पाईक असलेला खाकीतील कर्मचारी 24 तास ऑन ड्युटी असतो. त्यामुळे त्याचा कुटुंबांशी असलेला संवाद कमी होत आहे. कामाच्या तणावामुळे पोलिस दादांची व त्यांच्या कुंटुबींयाची पुरतीच दमछाक होत आहे. एकीकडे वरिष्ठांचा आदेश तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या अपुर्ण अपेक्षा त्यामुळे कामाच्या या ताणामुळे अनेकांना नाती गमावण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)