विम्बल्डन टेनिस : अँडरसनचा फेडररवर सनसनाटी विजय

लंडन – दक्षिण आफ्रिकेच्या आठव्या मानांकित केविन अँडरसनने अग्रमानांकित रॉजर फेडररवर सनसनाटी विजय मिळविताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. चार तास 35 मिनिटे रंगलेल्या उपान्त्यपूर्व लढतीत अँडरसनने फेडररचे आव्हान 2-6, 6-7, 7-5, 6-4, 13-11 असे संपुष्टात आणताना आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक खळबळजनक निकालाची नोंद केली.

दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत बाराव्या मानांकित नोव्हाक जोकोविचने 24व्या मानांकित केई निशिकोरीचा 6-3, 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली. त्याआधी भारताचा युवा टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा साथीदार न्यूझीलंडचा आर्टेम सिटॅक या जोडीला माईक ब्रायन आणि जॅक सॉक या सातव्या मानांकित अनुभवी अमेरिकन जोडीविरुद्ध कडवी झुंज दिल्यानंतर निसटता पराभव पत्करावा लागल्याने पुरुष दुहेरीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. परंतु उपान्त्यपूर्व फेरीतील त्यांची झुंज संस्मरणीय ठरली.  दिविज-आर्टेम जोडीला अखेर 6-7, 6-7, 7-6, 4-6 असा तीन तास 14 मिनिटांच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीतील अन्य उपान्त्यपूर्व लढतीत फ्रेडरिक निल्सन व जो सॅलिसबरी या बिगरमानांकित जोडीने बेन मॅकलॅछन व योहान स्ट्रफ या 14व्या मानांकित जोडीचे आव्हान 7-6, 4-6, 7-6, 7-6 असे मोडून काढताना उपान्त्य फेरी गाठली.

तसेच रॅव्हेन क्‍लासेन व मायकेल व्हीनस या 13व्या मानांकित जोडीने जेमी मरे व ब्रूनो सोरेस या पाचव्या मानांकित जोडीवर 6-7, 7-6, 5-7, 7-6, 6-4 अशी प्रदीर्घ झुंजीनंतर सनसनाटी मात करताना उपान्त्य फेरीत धडक मारली.
डॉमिनिक इनग्लॉट व फ्रॅंको स्कुगर या 15व्या मानांकित जोडीनेही रॉबिन हॅसे व रॉबर्ट लिंडस्टेड या बिगरमानांकित जोडीचा 6-3, 6-7, 7-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपान्त्य फेरीतील अखेरचे स्थान पटकावले.

अलेक्‍झांडर पेया व निकोल मेलिचार या 11व्या मानांकित जोडीने एदुआर्द रॉजर व्हॅसेलिन व सेबॅस्टि लाव्हाकोव्हा या पाचव्या मानांकित जोडीला 7-6, 4-6, 9-7 असे चकित करताना मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली.
तसेच इव्हान डॉडिग व लतिशा चॅन या तृतीय मानांकित जोडीने हेन्‍री कॉन्टिनेन व हीथर वॉटसन या 16व्या मानांकित जोडीचा 6-2, 7-6 असा सहज पराभव करीत मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तसेच जीन ज्युलियन रॉजर्स व डेमी स्कर्स या हॉलंडच्या चतुर्थ मानांकित जोडीने एरी होझुमी व बेन मॅकलॅचन या 14व्या मानांकित जोडीचा 6-4, 6-1 असा धुव्वा उडवीत मिश्र दुहेरीची उपान्त्यपूर्व फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)