केतकी : ट्रोलर्स आणि “व्याकरण’

मुक्तपणे व्यक्त होण्याचं माध्यम अशी जगभरामध्ये ख्याती असलेल्या समाज माध्यमांवर शिवराळ भाषेचा वापर करणारे, खुनाच्या, बलात्काराच्या, ऍसिड हल्ल्याच्या धमक्‍या देणारे, नको तो मुद्दा पकडून ट्रोल करणारे अनेक ट्रोल बहाद्दर अत्यंत मुक्तपणे व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या अंगी असलेल्या या एखाद्याला अत्यंत खालच्या भाषेत ट्रोल करण्याच्या गुणवैशिष्ट्यामुळेच जगभरामध्ये त्यांना ‘ट्रोलर्स’ अथवा ‘ट्रोलकरी’ ही विशेष बिरुदावली बहाल करण्यात आली आहे.

प्रामुख्याने सेलिब्रिटींना आणि त्यातल्या त्यात महिला सेलिब्रिटींना विशेष ‘टार्गेट’ करणारी ही जमात निरनिराळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दबा धरून बसलेली असते. एखाद्या महिला अथवा पुरुष सेलेब्रिटी, राजकारणी, क्रीडापटू अशा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित हस्तीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकताच हे ‘ट्रोलर्स’ ज्या प्रमाणे मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारावा आणि मधमाशांचा झुंड उठावा अगदी त्याचप्रमाणे पोस्टच्या कमेंट बॉक्‍सवर तुटून पडतात. कमेंट बॉक्‍समध्ये मग बॉडी शेमिंग, कपड्यांवरून कमेंट्‌सपासून ते अगदी सोबत झोपण्यापर्यंतच्या ‘मुक्त’ कमेंट्‌सचा अक्षरशः पूर येतो. मात्र आता हे चित्र सोशल मीडियावर एरवीचं झालं असल्याने या सगळ्यांकडे सेलिब्रिटीज देखील सपशेल दुर्लक्ष करताना दिसतात. उगीचं कशाला आपला टाईम आणि एनर्जी वाया घालवायची असं म्हणत सेलिब्रिटीज ट्रोलर्सला साफ इग्नोर मारतात परंतु सगळेच इग्नोर करू शकतात असं नाही.

याचंच ताजं उदाहरण आहे अभिनेत्री केतकी चितळे हिचं. केतकीने मध्यंतरी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॅन्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील असल्यानं सर्वांना समजेल अशा हिंदी भाषेत व्हिडीओ करण्याची वाजवी भूमिका मांडली होती. मात्र केतकीने आपली मातृभाषा सोडून हिंदीतून व्हिडीओ काढण्याची घेतलेली भूमिका काहींना अजिबात रुचली नाही. केतकीच्या या भूमिकेचा सोशल मीडियावर विरोध देखील होऊ लागला. लोकांना एखादी गोष्ट पटली नाही तर तिचा विरोध होणं, लोकांनी त्याबाबत प्रतिक्रिया देणं साहजिक आहे मात्र एखाद्या गोष्टीवर सोशली रीस्पॉन्ड होत असताना शब्दांचे भान बाळगणेही तेवढेच महत्वाचे असते. परंतु इतरांना यथेच्छ भाषेत ट्रोल करण्याची सवय लागलेल्या ट्रोलर्सने सवयीप्रमाणे ‘बिलो द बेल्ट’ किंवा कंबरेखालील कमेंट्‌स द्यायला सुरुवात केली खरी परंतु ट्रोलर्सच्या कमेंट्‌सना इतरांप्रमाणे इग्नोर न करता केतकीने यावर ठाम भूमिका घेतली.

मराठीसोडून हिंदी भाषेत व्हिडीओ बनवणार म्हणून केतकीला ट्रोल करत असलेल्या ट्रोलकऱ्यांनाचं केतकीने मराठीचे धडे दिले. शिवराळ आणि खालच्या दर्जाच्या भाषेतील कमेंट्‌समधील व्याकरणाच्या चुका काढत केतकीने ट्रोलर्सच्या तोंडावर चांगलीचं चपराक दिली. ट्रोलर्सविरोधात केतकीने घेतलेली ही भूमिका स्तुत्य असून आपलं कोण काय बिघडवणार? या अविर्भावात महिलांवर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या ट्रोलर्सना केतकीने त्यांच्याही मानगुटीवर कुणीतरी बसू शकते याचीच प्रचिती दिली आहे.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)