लंडन : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भरात असलेल्या भारतीय संघाला एका खराब खेळीची किंमत स्पर्धेतून बाहेर होत चुकवावी लागली.
दरम्यान, भारताविरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुप्टीलने केलेला थ्रो सामन्यास कलाटणी देणारा होता असं केन विल्यमसन याने म्हटले आहे.
केन विल्यमसन म्हणाला की, ‘खेळपट्टीचा केलेला सखोल अभ्यासच येथे उपयोगी ठरला. सव्वादोनशे धावादेखील आव्हानात्मक होतील असे माझे मत होते. जेव्हा आम्ही 239 धावांपर्यंत पोहोचलो, तेव्हाच माझा आत्मविश्वास वाढला. मॅट हेन्रीने रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना बाद करीत संघाचा विजयाचा पाया रचला. जडेजा व धोनी यांनी चिवट झुंज दिली. ते खेळत असतानाही मला विजयाची खात्री होती. धोनी याला बाद करताना मार्टिन गुप्टील याने केलेला थ्रो सामन्यास कलाटणी देणारा होता’.