केजरीवालांच्या मंत्र्यावर पुन्हा आयकर छापे 

नवी दिल्ली: आयकर विभागाने दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकार मधील एक मंत्री कैलाश गेहलोत यांच्या विविध ठिकाणांवर छापे घातले. कर चुकवेगीरीच्या संशयावरून हे छापे घालण्यात आल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. तथापी हा मोदी सरकारचा आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रकार असून त्यासाठी त्यांनी आयकर विभागाला हाताशी धरले आहे, असा आरोप त्या पक्षाने केला आहे.

कैलास गहलोत हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या वसंत कुंज आणि डिफेन्स कॉलनी भागातील घरांवर तसेच त्यांच्या पश्‍चिम विहार, नजाफगंज, लक्ष्मीनगर, पालम विहार आणि गुडगाव येथील व्यावसायिक ठिकणांवर छापे घालण्यात आले. गहलोत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत. ब्रिस्क इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍन्ड डेव्हलपर्स प्रा. लि आणि कार्पोरेट इंटरनॅशनल फायनान्शीयल सर्व्हिसेस अशा दोन कंपन्यांच्या कार्यालयांमधील कागदपत्रांची तपासणी या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. या कंपन्यांचे जो हिशोब आयकर खात्याकडे सादर करण्यात आला आहे त्याविषयी शंका निर्माण झाल्याने हे छापे घालण्यात आले आहेत.

दरम्यान या छाप्याच्या प्रकरणात पंतप्रधान मोदींचाच हात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला असून मोदींनी या प्रकरणात माफी मागावी अशी मागणी केजरीवालांनी केली आहे. ज्यांचे नीरव मोदी, विजय मल्ल्यांशी संबंध आहेत अशा मोदींनी आमच्यावर आयकर विभागाचे छापे घालणे हा अजबच प्रकार आहे. मोदींनी मी स्वता, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरही छापे घातले होते पण त्यात काहीही सापडले नाही. त्यामुळे पुन्हा आमच्यापैकी कोणावर छापे घालण्यापुर्वी आधीच्या छाप्यात काय सापडले ते जाहीर करावे आणि जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)