त्वचेचे सौंदर्य असे राखा

सौंदर्यात चेहऱ्याला फार महत्त्व आहे. चेहरा सुंदर दिसण्यासाठी बाजूच्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असेल तर आपला चेहरा सुंदर आणि सतेज दिसतो. त्याचबरोबर चेहऱ्याची काळजीसुद्धा घ्यायला हवी. तर अशी घ्यावी चेहऱ्याची काळजी.

– चेहरा दिवसातून 3-4 वेळा धुवावा. वाढते प्रदूषण, चेहऱ्यातून स्त्रवणारे नैसर्गिक तेल, घाम यामुळे धूळ, धूर त्वचेला चिकटतात, कडक ऊन, वारा यामुळेही त्वचेवर मृतपेशीचे थर साठत राहतात. यापासून संरक्षण होण्यासाठी थंड पाण्याचे हबके मारून चेहरा धुवा.

– चेहरा स्वच्छ मऊ होण्यासाठी घरातले बेसन पीठ, ज्वारीचे पीठ, चंदनाचं चूर्ण यांचा लेप 5 मिनिटे लावला तर फायदा होतो.

– प्रदूषणापासून चेहऱ्याला वाचवण्यासाठी हिरडा, आवळा, बेहडा चूर्ण समप्रमाणात घेऊन, उकळून तयार केलेला त्रिफळा जल चेहरा धुण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील तेल, घाम, धूळ जाऊन चेहरा स्वच्छ होतो.

– डोळ्याभोवती काळी वर्तुळे होणे, ओठांवर अतिरिक्त लव असणे, वांग, अति तेलकटपणा, मुरमे, ब्लॅक हेडस्‌ इ. गोष्टींनीही चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. डोळ्याभोवती काळी वर्तुळे होणे ही अॅनिमिया, ताणतणाव, अपुरी झोप, इ. विविध कारणांनी होतात. यावेळी चौरस आहार, योग्य 8 तास झोप, याबरोबर बदाम तेलाचा हलक्‍या हताने गोलाकार मसाज करावा. काकडी अथवा बटाट्याचे काप ठेवल्यानेही कृष्णावर्तुळांचे प्रमाण कमी होऊ शकते.

– ओठांवर अतिरिक्त लव असणे हे अंतस्रावी ग्रंथीच्या स्राव, त्यांचे संतुलन नसणे यामुळे असते त्यासाठी वेखंड आणि आंबेहळद घालून लावणे, हा उपाय दीर्घकाळ केल्यास फायदा होऊ शकतो.

– उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा टॅन झाली असेल, तर दही, मुळा, काकडी, टोमॅटो, संत्र्याचा रस ही घरगुती ब्लीच म्हणून वापरता येतात. त्यामुळे त्वचेचा राप कमी होऊन त्वचा पूर्ववत उजळण्यास मदत होते.

– अतितेलकटपणा असल्यास वारंवार चेहरा धुणे, बेसन, मुलतानी माती, चंदन यांच्या लेपाने फरक पडतो.

– ब्लॅक हेडस्‌ ही समस्या अतिरिक्त सिबम स्त्रावांमुळे व ते त्वचेच्या छिद्रात अडकून त्वचेबाहेर न पडल्याने घट्ट होऊन टणक ब्लॅक हेडस्‌ स्वरूपात दिसतात. चेहरा, नाक, कपाळ इ. ठिकाणी ते येतात. यासाठी अतिरिक्त तेलकटपणा काढून टाकणे.

– एखादा मेडिकल साबण वापरून चेहरा साफ करणे, रोमाछिद्रांची खोल स्वच्छता करणे यामुळे व वाफ घेतल्यानेही त्यापासून सुटका मिळू शकते.

– मुरमे ही देखील तरुणाईंची समस्या. केसांच्या मुळाशी असणाऱ्या सेबेशिअस ग्लॅंड (तेलग्रंथी) चे अतिकार्यक्षमतेने सीबमचा अतिरेक होणे, तैलग्रंथीचे इन्फलमेशन, सूज, सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर, मेकअप नीट न पुसणे यामुळेही ही समस्या उदभवते.

– त्यामध्ये कारण शोधून उपाययोजना आवश्‍यक आहे. तरीही चेहरा स्वच्छ ठेवणे व काही फेसपॅकमुळे ती समस्या कमी करणे आवश्‍यक आहे. आपल्या सौंदर्यात डोळ्यांचा फार मोठा सहभाग असतो. डोळे सुंदर तर आपण सुंदर. म्हणूनच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डोळ्यांना व्यायामाची गरज असते.

– सुजाता टिकेकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)