कचरा रस्त्यावर टाकून निघून जाणारे पथारी व्यावसायिक पालिकेच्या रडारवर
बकेट आढळून न आल्यास होणार दंडात्मक कारवाई
पुणे –दिवसभर रस्त्यावर व्यवसाय केल्यानंतर निर्माण झालेला कचरा रस्त्यावर टाकून निघून जाणारे पथारी व्यावसायिक आता महापालिकेच्या रडारवर आहेत. अशा प्रकारे कचरा करणाऱ्या व्यावसायिकांना कचरा बकेट ठेवणे महापालिकेने बंधनाकारक केले असून त्यांच्याकडे बकेट आढळून न आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेकडून पथारी परवाना देण्यात आलेल्या सुमारे 21 हजार व्यावसायिकांना या बकेट ठेवणे बंधनकारक असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
महापालिकेकडून पथारी व्यवसायाचा परवाना घेतलेल्या व्यावसायिकांमध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ तसेच फळे विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकलेला कचरा आढळून येतो. महापालिकेकडून शहरात सध्या सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो. हीच कारवाई या व्यावसायिकांवरही केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना आधी व्यवसायाच्या ठिकाणी कचरा संकलनासाठी बकेट ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्या ठेवण्यात आल्या आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे या बकेट आढळणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.