कोतकराच्या जामीन रद्दसाठी न्यायालयाची सरकारला नोटीस

नगर – केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याचा जामीन रद्द का करू नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला नोटीस काढली आहे. फिर्यादी यांनी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करत कोतकर याच्या जामिनावर हरकत घेतली आहे. या नोटिसीला सरकारतर्फे गुन्ह्याचे तपासी अधिकारी उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती वकिलांनी दिली.

केडगाव येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सायंकाळी हा प्रकार घडला. संग्राम कोतकर याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजीक कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या सांगण्यावरून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी त्यावेळी सुमारे 30 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली होती. या गुन्ह्यात भानुदास कोतकर याला वैद्यकीय कारणावरून काही अटी घालत जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या जामिनाविरोधात संग्राम कोतकर याने उच्च न्यायालयात धाव घेत हरकत नोंदवली होती. जामीन रद्द करण्याची विनंती संग्राम कोतकर याने अर्जाद्वारे केली आहे. न्यायालयाने संग्राम कोतकर यांच्या अर्जावर सरकारला नोटीस काढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)