केदार जाधव फिटनेस टेस्टमध्ये पास; भारतीय संघासोबत होणार 22 मे रोजी रवाना

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने विश्‍वचषक स्पर्धेतील त्याच्या सहभागावरुन काही दिवसांपासून चर्चा होत होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी केदार जाधव “फिट’ असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

केदारच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पॅट्रीक फरहात यांनी बीसीसीआयला अहवाल सादर केला आहे. भारतीय संघाचे फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फरहात यांनी केदारची दुखापत फारशी गंभीर नसून तो विश्वचषकाआधी बरा होईल, असे म्हटले आहे. केदार जाधव 22 मे रोजी संघासोबत इंग्लंडला रवाना होऊ शकणार आहे. केदार तंदुरुस्त झाल्याने भारताच्या मधळ्या फळीतील चिंता दूर झाल्याचे मानले जात आहे.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केदार काही दिवस वास्तव्याला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येथील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रीक फरहात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी फिटनेस टेस्ट पास करत विश्वचषकासाठी आपले नाव निश्‍चित केले. केदारच्या अनुपस्थितीत अंबाती रायुडू-अक्षर पटेल यांची नाव चर्चेत होती.
गेल्या काही वर्षांत केदारने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघात आपले स्थान निश्‍चित केले आहे.

श्रीलंकेविरुद्ध 2014 मध्ये पर्दापण करणाऱ्या केदारने आतापर्यंत 59 वन-डे सामन्यांमध्ये 1174 धावा केल्या आहेत. 43.50 च्या सरासरीने केदारने आतापर्यंत दोन शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. याचसोबत केदार जाधवने आतापर्यंत 27 बळी घेत, अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या स्पर्धेत केदारच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती.

द. आफ्रिकेशी पहिली लढत

विश्‍वचषक स्पर्धेला इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने 30 मे रोजी शुभारंभ होणार आहे. भारताची पहिली लढत 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघ दि. 25 आणि 28 रोजी न्यूझिलंड आणि बांग्लादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.

कोहलीची होणार अग्निपरिक्षा

विराट कोहलीने सातत्याने चांगले प्रदर्शन करत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. पण, इंग्लंडमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळणार असल्याने त्याच्या कर्णधारपदाची अग्निपरिक्षा होणार आहे. ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी केलेल्या विराट कोहलीला ही स्पर्धा जिंकून आणखी एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असल्याने खेळाडूंना मोठा आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)