काटदरे मसाले : साठ वर्षांची चोखंदळ ग्राहकांची पसंती

सन 1958 साली मसूर ता. कराड येथील स्थायिक असलेले बाळूकाका काटदरे यांनी मसाल्याच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ लावली.काटदरे मसाले आपले साठावे वर्ष साजरे करत आहे. या काटदरे मसाले यांच्या तीन पिढ्यांचा घेतलेला मागोवा.

सातारच्या मंगळवार पेठेत गुजर आळीत राम मंदिराकडे वळलात की, मसाल्याच्या खमंग वासाने पाय क्षणभर थांबायचे. पोटभर जेवण झाले असले तरी या चवीचा आस्वाद घ्यायला परत पानावर बसावं की काय असंच वाटायचं. ही सारी किमया फक्‍त काटदरे मसाले यांची होती. त्यांच्या घरावरूनच जातोय याची जाणीव साऱ्या खवय्यांना व्हायची. सातारच्या विविधांगी ओळखीमध्ये एक चविष्ट, खमंग नाव म्हणून काटदरे मसाले याची गणना होते.

व्यवसायातील तिसऱ्या पिढीने ग्राहकांच्या सेवेत उतरताना केलेले अविरत कष्ट ही यामागची यशोगाथा आहे. खमंग चटण्या, चटकदार मसाले, तयार पीठे, केशरयुक्‍त दूध मसाला, मिसळ मसाला यासारखी उत्पादने उत्पादित करताना प्रामाणिकपणा, सचोटी, चवीच्या दर्जाचे सातत्य, जपलेले व्यावसायिक मूल्य, व्यवसायातील नीटनेटकेपणा जपत असल्याने चोखंदळ ग्राहकांचा मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने गुजर आळी ते सातारा औद्योगिक वसाहतीतील स्वतंत्र जागेत टाकलेला व्यवसाय व्यवसायवृद्धीकडे गेल्याचे ते प्रतीक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 1958 साली मसूर ता. कराड मेथील स्थायिक असलेले बाळूकाका काटदरे मांनी काटदरे मसाल्यांची मुहूर्तमेढ लावली. डोक्‍यावरचा कर्जाचा बोजा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी अगदी घरगुती पध्दतीने मसाल्यांची निर्मिती बाळूकाका आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रमिलाबाई यांनी सुरू केली.रोज 10 किलो मसाले तयार करून परिसरातील गावामध्ये सायकलवरून मसाल्याची विक्री बाळूकाका करत.

उंब्रजहून सातारला एस. टी. ने प्रवास करून दिवसभर व्यापाऱ्यांकडे फिरून विक्री करून संध्याकाळी परतीचा प्रवास हा बाळूकाकांचा दिनक्रम होता ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊनच त्यांनी सातारमध्ये एक जागा भाडेतत्वावर घेऊन मसाले व्यवसायाला एक व्यावसायिक रूप देण्याचा धाडसी प्रयत्न त्याकाळी त्यांनी केला. बाळूकाकांचा मोठा मुलगा अनिल यांना वडिलांची चाललेली धडपड, होत असलेली ओढाताण लक्षात येत होती. अनिल काटदरेंना शिक्षण की वडिलांचा व्यवसाय हे दोन पर्याय समोर होते.

वडिलांना मदत म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत याच व्यवसायात उडी घेतली.अनिल काटदरेंनी सातारमध्ये जुन्या भाजी मंडईत किरकोळ मसाला विक्री व बिस्कीट, गोळ्या विक्रीचे दुकान थाटले. फिरून विक्री करण्यापेक्षा ग्राहकांच्या सोयीसाठी काटदरेंनी सुरू केलेल्या दुकानाला प्रतिसाद मिळत गेला.1972 साली मसाल्यांबरोबरच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, कारळा चटणी, जवस, तीळाची चटणी, मेतकूट यांची उत्पादने सुरू झाली.

मसूर ते सातारा आणि सातारा ते पुणे असा काटदरे मसाल्यांचा प्रवास 1975 साली धाकटा मुलगा अशोक काटदरे यांनी सुरू केला. पुण्यात अन्य उत्पादकांची ज्या पद्धतीने या मालाची विक्री होती, तशाच पध्दतीने पुड्यांचे पॅकमधून मसाल्यांची विक्री होताना त्यावर काटदरे मसाले हे नाव झळकावयास लागले. अनिल काटदरे यांच्या पत्नी शैलजा यांचा देखील या उद्योगाला हातभार लागत गेला.बाळूकाका-प्रमिलाकाकू, अनिल-शैलजा तर तिसरी पिढी पराग आणि दीपा या उद्योगात आले. एके काळी 10 किलो उत्पादन करणारा लघु उद्योग आज दररोज अडीच टनाचे उत्पादन करतो. परागने सातारा औद्योगिक वसाहतीत मोठ्या जागेत काटदरे मसाल्यांसाठी मोठा उद्योग सुरू केला.

अनिल काटदरेंच्या भगिनी कुंदा जोशी, भाचा अतुल जोशी यांनी अभिरूची उत्पादित थालीपीठ भाजणी, उपवास भाजणी, तांदूळ पीठ, इडली पीठ, ढोकळा पीठ, शेवई खीर मिक्‍स, अनारसा पीठ या उत्पादनांनी देखील काटदरे मसाल्याच्या यशामध्ये ग्राहकांची पसंती मिळवत खारीचा वाटा उचलला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, स्वच्छता आणि टापटीप राखत आजमितीस हा व्यवसाय सुमारे 30 वितरक आणि पाच ते सहा हजार किरकोळ विक्रेत्यांपर्मंत पोहोचला आहे.

काटदरे मसाले अन्य जिल्ह्यात पोहोचण्यासाठी तिसरी पिढी अहोरात्र परिश्रम घेत आहे. काटदरे कुटुंबियांनी कै. बी. ए. काटदरे स्मरणार्थ ट्रस्टची स्थापना करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कामगारांना पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक, समाजातील गरजूंना आर्थिक मदत, अनेक गरजू संस्थांना या ट्रस्टच्या माध्ममातून मदतीचा हात पुढे केला जातो. बघताबघता मा व्यवसायाने कधी साठी पूर्ण केली हे कळले देखील नाही. सध्या 66 वेगवेगळी उत्पादने उत्पादित केली असून ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यावर संशोधन केले जाते. काळाची पावले ओळखून आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन घटस्थापनेपासून काटदरेंनी वेबसाईटवरून विक्रीचे दालन सुरू केले. त्यामुळे भारतात कुठेही काटदरे उत्पादित वस्तू घरपोच मिळू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)