काश्‍मीर हा भारत-पाकमधील द्विपक्षीय मुद्दा- अमेरिका

दोघांनी सामोपचाराने तोडगा काढल्यास त्याचे स्वागत

वॉशिंग्टन- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्‍मीरप्रश्‍नावरील मध्यस्थीबाबत केलेल्या वक्‍तव्यावरून आता ट्रम्प प्रशासनाने सारवासारव सुरू केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आणि काश्‍मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असून दोन्ही बाजूंनी सामोपचाराने त्यावर तोडगा शोधल्यास अमेरिका त्याचे स्वागतच करेल, असे म्हटले आहे. भारताबरोबरची चर्चा यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादाविरोधात ठोस आणि अपरिवर्तनीय कारवाई केली जात असल्याचेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.

शांततापूर्ण शेजार हेच पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण-इम्रान खान
भारताबरोबरचे सामान्य संबंध दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरतील. शांततामय शेजार हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाची प्राथमिकता आहे, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारताबरोबर काश्‍मीरसह सर्व मुद्दयांवर चर्चेची पाकिस्तानची तयारी असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये इम्रान खान यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे स्वागत केले आहे. 

काश्‍मीर हा दोन्ही बाजूंसाठी द्विपक्षीय चर्चेचा मुद्दा आहे. भारत आणि पाकिस्तानकडून जर समोपचाराने तोडगा काढला जात असेल, तर त्याला अमेरिका सहाय्य करण्यास तयार आहे, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्‍त्यांनी वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. काश्‍मीरबाबतच्या अमेरिकेच्या धोरणामध्ये बदल झाल्याचे या निवेदनातून स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्रम्प यांची मध्यस्थी मागितली असल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने यापूर्वीच फेटाळला आहे.

काश्‍मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा आहे आणि या मुद्दयावरील चर्चेचे स्वरुप कसे असावे, हे दोन्ही देशांनीच ठरवावे असे अमेरिकेकडून दशकभरापासून सुचवले जात आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या यशस्वितेसाठी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई आवश्‍यक आहे. या सूत्राबाबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी कटिबद्धता व्यक्‍त केली आहे.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना आणि चर्चेस पोषक वातावरण करण्याला अमेरिका यापुढेही सहाय्य करत राहिल, असे या निवेदनामध्ये प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसनेही दोन्ही देशांकडून विनंती झाल्यास काश्‍मीर प्रश्‍नी सहाय्य करण्याची तयारी दर्शवली असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

जपानमधील ओसाका येथील “जी-20′ परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपल्याल काश्‍मीर प्रश्‍नी मध्यस्थीची विनंती केली होती, असे काल अध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरच्या चर्चेनंतरच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हा दावा केला होता.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)