…आणि एक उत्तम कलाकृती 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिकची चलती आहे, त्यातही मराठी बायोपिक आणि अभिनेता सुबोध भावे यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ नंतर सुबोध आता डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डॉ. घाणेकर यांचा अभिनय न पाहिलेला आजच्या युवा पिढीला हा चित्रपट मराठी रंगभूमीच्या एका सुपरस्टारची चांगल्या पद्धातीने ओळख घडवून आणतो.

कांचन काशिनाथ घाणेकर यांच्या ‘नाथ हा माझा’ या पुस्तकावर आधारित असलेला ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नावाप्रमाणेच डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारच्या आयुष्याभोवती गुंफण्यात आलेला आहे. चित्रपटाची कथा साधारण साठच्या दशकातली आहे. त्यावेळी हिंदी चित्रपटांमुळे मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू होता. त्याच सुमारास मुंबईतील एक प्रसिद्ध डेंटिस्ट आपली चांगली प्रॅक्टिस सोडून नाटकांमध्ये मिळेल ते काम करत स्ट्रगल करत होता. प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकासाठी संभाजीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा शोध सुरू होतो आणि मास्टर दत्ताराम यांना डॉ. घाणेकरांच्या रुपाने संभाजी गवसतो. आणि मराठी रंगभूमीवर सुरु होते काशिनाथ पर्व.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट डॉ. घाणेकरांच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर उलगडतो कथेचा काळ साधारण १५  ते २०  वर्षांचा आहे. त्यामुळे आपल्याला सुमारे दोन दशकाचा मराठी चित्रपट आणि रंगभूमीचा ओझरता लेखाजोखा बघायला मिळतो. कोणत्याही व्यक्तीचे चरित्र चित्रपटात मांडणे तसे अवघड असते, त्यात एखाद्या कलाकाराचा जीवनपट मांडणे अधिकच अव्हानात्मक ठरते कारण त्याच्या जीवनाचे विविध पैलू, चढ उतार त्याच्या चाहत्यांना माहिती असतात. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एखाद्या चित्रपटात घडाव्यात अशा अनेक रंजक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. यामुळे चित्रपटाची कथा आपल्याला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी ठरते.

कलाकारांच्या भूमिकेविषयी सांगायचे तर अभिनेता सुबोध भावे याने पुन्हा एकदा स्वःतला सिद्ध केले आहे.  सुबोध या चित्रपटात हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसला आहे. त्याचसोबत त्याने प्रत्येक दृश्यात त्याच्या अभिनयाने एक जिवंतपणा आणला आहे. अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेतील सुमीत राघवन यांचं. सुमीत यांनी डॉ. लागूंची भूमिका करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. तसंच भालजी पेंढारकर यांची भूमिका मोहन जोशी यांनी ताकदीने साकारली आहे. नंदिता धुरी आणि वैदेही पराशुरामी यांनी सुबोधाला दामदार साथ दिल्याने हित्र्पात अधिक रंगतदार झाला आहे. सोनाली कुलकर्णी सुलोचनाबाईंच्या भूमिकेत उत्तम आहे. प्रसाद ओक याने साकारलेले प्रभाकर पणशीकरही दाद मिळवून जातात.

चित्रपटाची पटकथा उत्तम असली तरी चित्रपटाची तांत्रिक बाजू मात्र काहीशी कमकुवत आहे, साठ – सत्तरचे दशक उभे करताना काही उणिवा राहिल्याचे स्पष्टपणे दिसते, तसेच काही लोकेशन्स रिपीट झाल्याने त्यातली गंमत कमी झाली आहे. तसेच डॉ. घाणेकर यांचे कलाकार म्हणून चित्रण करताना व्यक्ती म्हणून त्यांच्या आयुष्यातील काही बाबी कमी दाखवण्यात आल्याचे दिसते. तसेच कलाकारांच्या मेकअपवर अधिक लक्ष देण्याची गरज होती.

थोडक्यात सांगायचे तर एका सुपरस्टारचे वादळी व्यक्तीमत्व ७० एमएमच्या पडद्यावर साकारणे सोपे नव्हते, मात्र सर्व कलाकार आणि दिग्दर्शाकाने ते पेलण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे, आजच्या तरुणाईला माहित नसलेला मराठी रंगभूमीवरचा एक टप्पा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या उत्तम चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासामोर आला आहे तो बघायलाच हवा.

चित्रपट – ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’
निर्मिती – वायकॉम १८
दिग्दर्शक – अभिजित देशपांडे
कलाकार – सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमीत राघवन, प्रसाद ओक, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी, आनंद इंगळे, सुहास पळशीकर 
रेटिंग – ***

– भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)