कर्नाटक सरकार संकटात

कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांचा राजीनामा

बंगळूर -कॉंग्रेस आणि जेडीएस या कर्नाटकमधील सत्तारूढ मित्रपक्षांच्या 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. त्यामुळे कायम अस्थिरतेच्या सावटाखाली असणारे 13 महिन्यांचे आघाडी सरकार मोठ्या राजकीय संकटात सापडले आहे. आता ते सरकार टिकणार की जाणार याविषयीचे चित्र मंगळवारी स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा सादर करण्यासाठी कर्नाटक विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांचे कार्यालय गाठले. ते उपस्थित नसल्याने आमदारांनी त्यांच्या कार्यालयात राजीनामापत्रं सादर केली. कुमार मंगळवारी त्यांच्या कार्यालयात जाणार आहेत. त्यादिवशी ते आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतील. त्या आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास सत्तारूढ आघाडीचे बहुमत संपुष्टात येईल. कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ 224 आहे. त्यात सत्तारूढ आघाडीचे संख्याबळ 118 इतके आहे.

मात्र, आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास आघाडीचे संख्याबळ 105 पर्यंत खाली येईल. विरोधी बाकांवर असणारा भाजप संख्याबळाच्या दृष्टीने कर्नाटक विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे 105 आमदार आहेत. त्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी कुणालाही 113 हा बहुमताचा जादुई आकडा गाठणे आवश्‍यक आहे.

कॉंग्रेसमधील काही आमदार बऱ्याच काळापासून नाराज आहेत. त्याशिवाय, कॉंग्रेस आणि जेडीएस या मित्रपक्षांमध्ये सातत्याने धुसफूस सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडीएसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्या निवडणुकीत मुसंडी मारल्यामुळे उत्साह दुणावलेला भाजप कर्नाटक सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करेल, असा आरोप सत्तारूढ आघाडीकडून सातत्याने केला जात होता. अशातच आमदार राजीनामे देण्यासाठी सरसावल्याची घटना घडली. मात्र, भाजपने सत्तारूढ आमदारांच्या राजीनाम्याशी काही देणे-घेणे नसल्याचे म्हटले आहे.

राजीनामा देणाऱ्यांपैकी एक असणारे जेडीएसचे ए.एच.विश्‍वनाथ यांनीही ताज्या घडामोडीशी भाजपचा काही संबंध असल्याचा इन्कार केला आहे. आघाडी सरकारला आमदारांना विश्‍वासात घेण्यात अपयश आले आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे आम्ही राजीनाम्याचा निर्णय घेतला, असे विश्‍वनाथ यांनी म्हटले. दरम्यान, आमदारांचे बंड शमवण्यासाठी कॉंग्रेसने आपले ट्रबलशुटर असणारे राज्याचे मंत्री डी.के.शिवकुमार यांना पुढे केले. शिवकुमार यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

आता ते प्रयत्न यशस्वी ठरणार का याबाबत उत्सुकता आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांनी त्यांचा निर्णय कळवण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांचीही भेट घेतली. त्यामुळे बंडाचे निशाण फडकावणारे आमदार माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच संकेत मिळत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)