कर्नाटक प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद; दिवसभरासाठी कामकाज तहकुब

नवी दिल्ली – कर्नाटकात भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस सदस्यांनी आज राज्यसभेत गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज वारंवार तहकुब करावे लागले. शेवटच्या तहकुबीनंतरही हा गोंधळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकुब करावे लागले आहे. कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌याला तृणमुल कॉंग्रेस, व दोन्हीं कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.

लोकसभेत कॉंग्रेसचा सभात्याग
लोकसभेतही कॉंग्रेसने हा विषय उपस्थित केला. पक्षाचे गटनेते अधिर रंजन चौधरी म्हणाले की भाजपने कर्नाटकात विरोधकांची शिकार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्या हाच प्रकार मध्यप्रदेशातही सुरू होईल. कर्नाटकातील राजीनामा नाट्यांशी आपला काही संबंध नसल्याचे भाजप सांगत असले तरी राजभवनात राजीनामा देऊन बाहेर आलेल्या आघाडीच्या आमदारांना नेण्यासाठी तेथे बाहेर गाडी उभी असते. त्यांना तेथून विमानाने अन्य गावात नेले जाते. तेथेही त्यांना न्यायला गाड्यांची व्यवस्था केली जाते. हे सगळ कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे असा सवाल त्यांनी केला. कॉंग्रेस सदस्यांनी कामकाज तहकुबीची सुचना सभागृहात दिली होती. पण सभापतींनी ती अमान्य केली. सभापतींनी हा विषय उपस्थित करू देण्यास नकार दिल्याने कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला. त्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेही सहभागी झाले होते.

आज सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. त्यासाठी ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे आज बोलण्यासाठी उभे राहिले असतानाच कॉंग्रेस व अन्य सदस्यांनी कर्नाटक सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांचा विषय उपस्थित करून सभापतींच्या आसनापुढे गोंधळ घातला. कॉंग्रेस व जेडीएस आमदारांना फूस लाऊन फोडले जात आहे, कर्नाटकात लोकशाहीची हत्या केली जात आहे असा आरोप कॉंग्रेस व अन्य पक्षांच्या सदस्यांनी केला. त्यामुळे सुरूवातीला तीन मिनीटांसाठी, नंतर दुपारी बारा वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर पुर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकुब करावे लागले.

कर्नाटकातील राजकीय स्थिती बाबत कामकाज तहकुबीची सुचना कॉंग्रेसचे बी. के हरिप्रसाद यांनी दिली होती. पण अध्यक्ष नायडू यांनी ती अमान्य केल्यानंतर गोंधळाला सुरूवात झाली. तृणमुल कॉंग्रेसचे सदस्य या गोंधळात अध्यक्षांच्या आसनासमोर उभे राहून गोंधळ घालत होते पण त्यांचा गोंधळ याच विषयाशी संबंधीत होता काय हे मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)