बंगलुरू – सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या याचिकांवरून दिलेल्या निर्णयाचे कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर. रमेशकुमार यांनी स्वागत केले आहे. या प्रकरणात आपण घटनात्मक तरतूदींचे पालन करून जबाबदारीने निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. आमदारांच्या राजीनाम्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने सभापतींवर त्यांच्यावर सोपवला आहे. ते म्हणाले की या निकालपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर मोठीच जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे मी आता यावर अधिक जबाबदारीने आणि घटनात्मक तत्वांच्या आधारे निर्णय घेईन.
या साऱ्या घडामोडीत आता सभापतींच्या निर्णयाला महत्व आले आहे. त्यांच्या निर्णयावर कुमारस्वामी यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सभापती आता या आमदारांच्या राजीनाम्यावर आधी निर्णय घेणार की त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणार यावर सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.