कर्जतमधील नऊ गावांना टॅंकर मंजूर

कापरेवाडी, रवळगाव, डिकसळ, रेहेकुरी येथे टॅंकरची प्रतीक्षा; टंचाईने नागरिक हैराण

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील नऊ गावांना टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या झळांनी व्याकूळ झालेल्या कर्जतकरांना मोठ्या प्रतीक्षेनंतर हे टॅंकर मंजूर झाले आहेत. मात्र अजूनही कित्येक गावे टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत आहे.
यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीप तसेच रब्बीची पिके वाया गेली आहेत. तलाव, बंधारे, नाले आदी पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामीण भागातील जनता होरपळून निघाली आहे. मोठ्या कष्टातून जपलेल्या पशुधनाला वाचवताना पशुपालकांची दमछाक होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, शाळकरी मुले तसेच पुरुषांची भटकंती सुरू आहे. शेतातील बोअरवेल, विहिरीमधून पाणी काढून सायकल तसेच दुचाकींना ड्रम बांधून पाण्याची वाहतूक केली जात आहे.
तालुक्‍याच्या पूर्व भागात टंचाईची तीव्रता अधिक भीषण आहे. ग्रामपंचायततर्फे टॅंकर मागणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. मात्र मोठ्या प्रतीक्षेनंतर फक्त नऊ गावांचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत.

“मंजूर झालेल्या नऊ गावांमध्ये टॅंकर सुरू केले जात आहेत. उर्वरित गावांना लवकरच टॅंकर मिळतील. शेवगाव येथील ठेकेदारामार्फत गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.
– दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत

गावे व मंजूर खेपांची संख्या कंसात : पाटेगाव (साडेपाच), बहिरोबावाडी (4), टाकळी खंडेश्वरी (5), नागमठाण(1), चापडगाव (7), नवसरवाडी (3), हंडाळवाडी (1), माही (3), दिघी (2) इतर अनेक गावे मात्र अद्यापही टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. नागमठाणसाठी मांदळी येथून तर उर्वरित आठ गावांसाठी पाटेवाडी नजीकच्या तलावाखालील विहिरीतून टॅंकर भरले जाणार आहेत.

बहिरोबावाडीकरांना दिलासा

बहिरोबावाडीत जून महिन्यापासूनच पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे. भैरवनाथ मंदिरानजीकच्या तलावातील पाणी शेतीसाठी उपसल्याने गाव तसेच वाड्या-वस्त्यांवर नागरिकांना टंचाईच्या अधिक झळा बसू लागल्या. जनतेतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या सरपंच विजय तोरडमल यांच्यासमोर टंचाईला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान होते. पाणीटंचाईमुळे जनतेचे हाल होऊ नयेत यामुळे त्यांनी लगेचच स्वखर्चातून पाण्याचे टॅंकर सुरू केले. सुपे येथून हे टॅंकर भरण्यात आले. गेल्या पाच-सहा महिन्यात लाखो रुपयांचा खर्च त्यांनी पेलला. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासकीय टॅंकर सुरू झाल्याने बहिरोबावाडीकरांना दिलासा मिळाला आहे.

टॅंकरची प्रतीक्षा संपेना

पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्याने अनेक गावांनी टॅंकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले. मात्र या सर्व गावांमध्ये टॅंकरला मंजुरी देण्यात आलेली नाही. कापरेवाडी, रवळगाव, डिकसळ, रेहेकुरी आदी गावांना अजूनही टॅंकरची प्रतीक्षा आहे. शासनाच्या लाल फितीचा फटका येथील ग्रामस्थांना किती दिवस बसतो हा प्रश्न आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)