कर्जतची विकासकामे फक्त टक्केवारीसाठी : रोहित पवार

कर्जत: आमदार असलेल्या काळात एक किलोमीटर रस्ता केला, आता मंत्री झाल्यावर पाच किमीचा रस्ता करणाऱ्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी शेजारच्या तालुक्‍यात मात्र शेकडो किलोमीटरचे रस्ते होत असल्याचे एकदा पहावे. मात्र कर्जत येथील विकासकामे फक्त टक्केवारीसाठी होत असल्याची खरमरीत टीका युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत येथील मेळाव्यात केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कर्जत येथील भाग्यतारा मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार बोलत होते. तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, शाम कानगुडे, विजय मोढळे, शहाजी राजेभोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस ओंकार गुंड, फिरोज पठाण, रघुनाथ काळदाते, रज्जाक झारेकरी, सागर मोहिते, स्वप्नील तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व तरुण वर्ग उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार यांनी भाजप सरकार वर सडकून टीका करताना, देशात आपली सत्ता असताना सर्वाधिक कारखाने व उद्योग महाराष्ट्रात वाढले व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला. मात्र या सरकारच्या काळात राज्यात उद्योग व्यवसाय न वाढल्याने बेकारीत जास्त वाढ झाली. या सरकारने शेतकऱ्यांची व युवकांची फसवणूक केली. हे सरकार आपल्यापासून खऱ्या गोष्टी लपवून ठेवतेय व खोट्या गोष्टी समोर दाखवत आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता टीका करताना पवार म्हणाले, मंत्र्यानी येथील गावांचा विकास केला असता तर या भागातील जवळजवळ चाळीस हजार लोकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली नसती. हे मंत्री फक्त कार्यकर्त्यांच्या घरी मटन खायला आल्यावरच लोकांना भेटतात. इतर वेळेस ते मतदार संघात दिसत नाहीत.

आघाडीची सत्ता असताना कर्जत तालुक्‍यात दुष्काळात दीडशेच्यावर जणावरांसाठी छावण्या सुरू केल्या होत्या, परंतु आता इतका भयानक दुष्काळ असूनदेखील पन्नासही छावण्या सुरू केल्या नाहीत. पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय छावणी मंजूर होत नाही. असाही आरोप रोहित पवार यांनी केला. यासाठी आपल्या विचाराचा खासदार पाहिजे, असल्यास आपण सर्वांनी एकत्र या असे आवाहन पवार यांनी केले. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना आता जनता जागा दाखविणारच असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दक्ष राहिले पाहिजे. यासाठी गावपातळी लवकरच प्रशिक्षणे घेतली जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली मेळाव्यात असलेली उपस्थिती पाहून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना उत्साह आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)