संधी दिल्यास कर्जत-जामखेड लढविणार ; रोहित पवार यांचे सूचक वक्तव्य

जामखेड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांनी जबाबदारी व संधी दिल्यास, कार्यकर्ता म्हणून आगामी विधानसभा निवडणूक कर्जत-जामखेडमधून लढवू असे सूचक वक्तव्य पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी केले.

पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व असेलेले जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार हे रविवारी जामखेड तालुक्‍यातील विविध कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सायंकाळी जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत-जामखेडचे पक्ष निरीक्षक किशोर मासाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, शरद भोरे, संजय वराट, शरद शिंदे, उमर कुरेशी, अमजद पठाण, डॉ. कैलास हजारे, नगरसेवक पवन राळेभात, दिंगबर चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले, जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी जागा असताना कमी पाण्यावर चालणारे उद्योग पालकमंत्र्यांनी का आणले नाही? असा सवाल करीत अगोरदर जामखेड तालुक्‍यातील गुंडागर्दी कमी करायला हवी. शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, त्यामुळे मोठ्या कंपन्या इकडे येत नाहीत. पालकमंत्री असतानाही कर्जत-जामखेड तालुक्‍यात एकही मोठा उद्योग येत नाही. उद्योग नसल्याने तरुणांना स्थलांतरित होण्याची वेळ येते. जामखेड दहशतीखाली असून अधिकारीही दहशतीखाली काम करीत आहेत. अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दहशतीला घाबरण्याचे कारण नाही. अधिकाऱ्यांनी जीव ओतून काम करावे.तालुक्‍यातील रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी असून, रस्त्यामध्ये मात्र खड्डेच आहेत. जलसंधारणाचे कामे होऊनही तालुक्‍यात सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवराचे नुसते खड्डे दिसत आहेत. मतदार संघाला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे संकेत देऊन विधानसभेसाठी दंड थोपटले.

कर्जत-जामखेड मतदारसंघ हा आपल्याला परिचित असल्याचे सांगून पवार म्हणाले, की यावेळी मला संधी द्यावी, अशी असंख्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांची इच्छा आहे. लोकांचा आग्रह आणि वरिष्ठांनी दिलेली संधी जुळून आल्यास कार्यकर्ता म्हणून मी ती नक्कीच पुढे नेईन, असेही सुचक वक्तव्य केले. केंद्र आणि राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. महागाई वाढली, शेत मालाचे भाव पडले, अच्छे दिनच्या केवळ थापा मारणारे हे थापाडे सरकार असून, ते आपल्याला घालवायचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पोकळ आश्‍वासनांना मतदार कंटाळले आहेत. त्यांचा सरकारवरील विश्‍वास उडाला आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी-कॉंग्रेस सत्तेवर येणार असल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)