नवी दिल्ली – यंदा कारगील विजयाचे 20 वे स्मृती वर्ष आहे. त्यानिमीत्त कारगीलवरील विजयाच्या आठवणी लोकांमध्ये जागवण्यासाठी आणि त्या युद्धाची माहिती जनतेला देण्यासाठी रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. दहा रेल्वे गाड्यांमध्ये कारगील विषयीचे फोटो आणि माहिती प्रवाशांना देण्यात येणार आहे. सोमवारीपासून या दहा गाड्यांमध्ये हे फोटो प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
फोटो आणि माहितीच्या माध्यमातून दहा रेल्वे गाड्या कारगील विजयाची माहिती सादर करणार आहेत. आणि त्यात शहीद झालेल्यांची माहितीही प्रवाशांना दिली जाणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून दिली. यातील पहिली गाडी दिल्ली-वाराणसी काशी विश्वनाथ एक्स्प्रेस ही असून या गाडीला सोमवारी आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे झेंडा दाखवतील.
यावेळी काही शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचाहीं सत्कार केला जाणार आहे. ब्रम्हपुत्रा एक्स्प्रेस, सीमांचल एक्स्प्रेस, गोंडवन एक्स्प्रेस आणि गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस याही गाडयांमध्ये हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.