कराडात आज आघाडीचा एल्गार

-कोल्हापुरात युतीची ललकारी
-नरेंद्र पाटील यांच्या सेना प्रवेशाची औपचारिकता

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे आणि घडामोडी रंगतदार वळणावर येऊन पोहचल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा अधिकृत नारळ रविवारी थोरल्या पवारांच्या उपस्थितीत फोडला जाणार असून या निमित्ताने राष्ट्रवादीचे दत्त चौकात जोरदार शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. कराडात राष्ट्रवादीचा यल्गार घुमत असताना कोल्हापुरात युतीच्या प्रचाराची तुतारी फुंकली जाणार आहे. नुकतेच भाजपवासी झालेल्या नरेंद्र पाटलांचा प्रवेश येथील सेनेच्या जाहीर मेळाव्यात होणार असून मुंबई ते कोल्हापूर व्हाया मंद्रुळकोळे असा प्रवास करत माथाडी बांधवांनी चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे.

साताऱ्यात बऱ्याच राजकीय अडथळ्यानंतर थोरल्या पवारांच्या आशीर्वादाने खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे तिकिट पदरात पाडून घेतले असून खासदारकीच्या हॅटट्रिकसाठी ते सज्ज झाले आहेत. सहा मतदारसंघातील आमदारांशी थेट संपर्क आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उदयनराजे यांनी कंबर कसली आहे. गेल्या पाच वर्षात उदयनराजे यांचा कराड व पाटण तालुक्‍यात अपवाद वगळता कोणताच संपर्क राहिला नाही की खासदार निधीचा प्रत्यक्ष रुपया खर्ची पडला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचे मळभ दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने उदयनराजे यांच्या प्रचार मोहिमेचा नारळ कराडात फोडण्याचा निर्णय घेतला.

कराडच्या दत्त चौकात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असून  पवार काय कानमंत्र देणार याकडे सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वतः उदयनराजे यांनी सकाळी कराड़ात तब्बल चार तास तळ देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची मलकापूर येथे भेट घेऊन नाराज कॉंग्रेस सदस्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण व उदयनराजे यांनी यशस्वी शिष्टाई करत रविवारच्या मेळाव्यात सामील होण्याचे आवाहन केले. मात्र तरीही कराड दक्षिणमधील कार्यकते अद्याप नाराज असल्याचे वृत्त आहे. तरीसुध्दा राष्ट्रवादीचा लोकसभेच्या प्रचाराचा हा पहिलाच मेळावा असल्याने शक्‍तीप्रदर्शनात कोठे कसूर राहू नये म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी कराडात तळ दिल्याने राजकीय पारा चढला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे स्टार कॅपेनर रामराजे नाईक निंबाळकर स्वतः राष्ट्रवादी मेळाव्याच्या तयारीवर साताऱ्यातून बारकाईने लक्ष ठेऊन होते.

सातारा जिल्हयात आघाडीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूरच्या कळंबा रोडवरील तपोवन मैदानात दिवसभर युतीची लगीनघाई सुरू होती. सातारा व पालघर वगळता जागावाटपाचा हिशोब संपल्याने युतीचा एकत्र प्रचार दणक्‍यात सुरू झाला आहे. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रचाराचा अधिकृतपणे नारळ फुटणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा शिवसेना प्रवेश होणार असून सातारा लोकसभेच्या आखाड्यात उदयनराजे यांच्या विरोधात सेनेकडून पाटलांची दावेदारी पेश होणार असल्याचे दाट संकेत आहेत. कराड पाटण जावली या तालुक्‍यात माथाडी बांधवांची संख्या लक्षणीय असून पाटलांची येथे व्होट बॅंक मजबूत आहे. ते उदयनराजे यांना मनी व मसल या दोन्ही मुद्यावर तगडी लढत देऊ शकतात हे लक्षात घेऊनच सेनेने पाटलांना आखाडयात आणण्याचे मनसुबे चालवले आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना यंदाची निवडणूक फार सोपी राहणार नाही याची राजकीय तजवीज करण्यात आली आहे. कराडात राष्ट्रवादीचा तर कोल्हापुरात युतीचा प्रचाराच्या निमित्ताने राजकीय टणत्कार घुमणार हे स्पष्ट झाले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)